ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीची रेवा कौरासे मराठी बिग बॉसमध्ये

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        व्यक्तीच्या अंगात गुणवत्ता असली की स्वतःच्या क्षमता रुंदावण्यास कोणतेच अडथळे बाधक ठरत नाहीत. येथील रेवा विठ्ठल कौरासे या सामान्य कुटुंबातील युवतीने तिच्या गुणवत्तेच्या जोरावर स्थानिक कक्षा रुंदावून थेट मुंबईच्या माया नगरीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. सध्या ती एका टीव्ही चॅनेलवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ या मराठी रिॲलिटी शो मध्ये सहभागी झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आनंद व्यक्त होत असुन चर्चा होत आहे.

रेवा ही स्थानिक वेकोलीच्या चारगाव कॉलनी मधील रहिवासी आहे. तिचे वडील माजरी येथे वेकोली मधे कार्यरत आहे तर आई गृहिणी आहे. रेवा ही चार बहिणीतील सगळ्यात लहान बहीण आहे. रेवाचे दहावी पर्यंतचे शिक्षण स्थानिक जिल्हा परिषद शाळेत झाले, त्यानंतर शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण करुन चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०१९ मधे पदवी पूर्ण केली. अभियांत्रिकीला असताना तिने सुरत येथे झालेल्या ऑरा फेस ऑफ इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेमुळे तिचा आत्मविश्वास वाढला. तिने आत्मविश्वासाच्या जोरावर मॉडेलिंग, अक्टिंग या क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. त्यानंतर रेवा ने मुंबई येथे मॉडेलिंगचे प्रोजेक्ट्स केलेत. सोबतच विविध ब्रँड्स साठी जाहिराती शूट केल्या. ‘प्यार का पहला अध्याय, शिवशक्ती’ या सीरियल मधे ‘रिमझिम’ व ‘दिवाणीयत’ या सीरियल मधे ‘आलिया’ या भूमिका तिने साकारल्या. हे सर्व सुरु असतानाच तिला मराठी बिग बॉस ची ऑफर आली आणि तिने ती ऑफर स्वीकारली. दोन हजार सहभागी सोबत तिचीही ऑडिशन्स प्रक्रिया पार पडली व त्या सर्वांत तिची निवड झाली व वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून ती बिग बॉस मधे सहभागी झाली. आता ती या बीग बॉस रिॲलिटी शो मुळे घराघरात पोहोचली आहे.

रेवाच्या जन्माअगोदर घरची परिस्थिती जेमतेम होती. तिच्या जन्मानंतर वडिलांना वेकोली मधे नोकरी लागली. त्यामुळे घरी तिला सर्व लकी मानतात. आई वडील व बहिणींचा सतत पाठिंबा तिला होता. त्यामुळे तिने तिचे करिअर मुंबईच्या चित्रपट सृष्टीत घडविण्याचे ठरविले.

या अगोदर रेवा ने हिंदी चॅनल्स वर काम केले, परंतु मराठी बिग बॉस हा एक लोकप्रिय रिॲलिटी शो असल्याने घरोघरी बघितल्या जातो. त्यात आपल्या गावची मुलगी दिसत असल्याने आनंद व्यक्त केल्या जात असून चर्चा होत आहे. या शो मुळे आपल्या गावची मुलगी मुंबईतील मायानगरीत नाव कमवीत असल्याचे सर्वांना माहीत झाले. नुकतच महिला दिनाचे औचित्य साधून रेवाचा नगर पालिकेतर्फे सत्कार करण्यात आला, तो सत्कार तिच्या आई वडिलांनी स्वीकारला.

      रेवा ला बिग बॉस मधे बघून आम्हाला खूप आनंद होतो आहे. आमचा तिला सपोर्ट आहे. तिने ट्रॉफी घेऊन यावे, हीच आमची अपेक्षा आहे. 

                              – अंजली भेले, मैत्रीण

       ज्या क्षेत्रात किती स्ट्रगल करावा लागेल व केव्हा यश मिळेल याचा काहीही अंदाज नसताना रेवा ने एकटीने जाऊन तिथे स्वतःला स्टँड करणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथमच बिग बॉस या रिॲलिटी शो मध्ये रेवा सहभागी झाली आहे.

                            – धनश्री कौरासे, बहिण

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये