छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला पोंभूर्ण्यात प्रारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा :- ग्रामीण भागातील नागरिकांचे महसुली प्रश्न तत्काळ निकाली काढण्यासाठी महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तहसिल कार्यालयाच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानाची सुरुवात दि.१४ मार्चपासून ग्रामपंचायत परिसर आंबेधानोरा येथे होणार असून पुढील शिबिरे दि.१० एप्रिल रोजी नवेगाव मोरे येथे तर दि.१७ एप्रिलला चिंतालधाबा येथे तसेच दि.८ मे रोजी राजराजेश्वर सभागृह पोंभूर्णा येथे आयोजित करण्यात आले आहेत.
सदर शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ उताऱ्यातील दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व ८ अ उतारे वितरण, संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ मंजुरी, विद्यार्थ्यांना विविध दाखले वाटप, सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत पट्टे वितरण, रेशन कार्ड, ॲग्रीस्टॅक योजना आदी प्रशासकीय कामांचे निराकरण करण्यात येणार आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने दि.१४ मार्च रोजी आंबेधानोरा येथे विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून महिलांसाठी आरोग्य तपासणी, आरोग्य सल्ला, लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत ७/१२ वर नाव नोंदणी, पशुवैद्यकीय लसीकरण,पीएम किसान व संजय गांधी निराधार योजना तक्रार निवारण, आधार कार्ड अपडेट, कृषी मार्गदर्शन तसेच युवकांसाठी करिअर मार्गदर्शन व हेल्प डेस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पशुंचे मोफत लसीकरण,स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप,मोफत रेती वाटपासाठी टी.पी. वाटप व महसूल विभागाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवून प्रलंबित प्रकरणे तत्परतेने निकाली काढणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित ठिकाणी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांनी केले आहे.



