निप्पॉन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यात याव्या
भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत आ. करण देवतळे यांचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील निप्पॉन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जैसे तेच असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नवीन येऊ पाहत असलेल्या न्यू.ग्रेटा व न्यू.एरा या कोल गॅसिफिकेशन या उद्योगाच्या बाबतीत साशंकता आहे.
दिनांक १४ रोजी राज्याचे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री, कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याकरिता दोन्ही कंपनी व प्रशासन, पोलिस विभाग दक्ष होऊन मुख्यमंत्र्याच्या आगमनाला कोणतेही गालबोट लागू नये,कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जय्यत तयारीत लागला आहे.
मात्र भूमिपूजनाअधी निप्पॉन प्रकल्पग्रस्तांच्या सानुग्रह अनुदान, नोकरीची हमी व याबाबत लेखी त्रिस्तरीय करार करावा अशी मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी कित्येक दिवसापासून रेटून धरली होती.
अद्याप त्यावर शासन वा कंपनीने कोणताही तोडगा न काढता प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसून उद्घाटनाचा घाट घातला आहे. याच पार्श्वभूमीवर विधान भवन,मुंबई येथे भद्रावती मतदार संघाशी संबंधित या महत्त्वाच्या, व प्रकल्पग्रस्त शेतकरी विषयावर आमदार करण देवतळे यांनी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली.
प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधत, भूमिपूजना पूर्वीच या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत तातडीने बैठक घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावाव्या आणि कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण होऊ देऊ नये यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी भूमिका यावेळी मांडली.
आ. करण देवतळे यांच्या प्रयत्नांना यश येऊन किमान आतातरी प्रकल्पग्रस्तांच्या पदरी निराशा पडणार नाही असा आशावाद निप्पॉन प्रकल्पग्रस्त व्यक्त करू लागले आहे.



