भद्रावती बाजार समितीत ९ मार्चपासून चणा-तूर खरेदी नोंदणी
शेतकऱ्यांना तालुक्यातच विक्रीची सुविधा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या माध्यमातून शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीनुसार (MSP) चणा व तूर खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया ९ मार्च २०२६ पासून कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती येथे सुरू होणार आहे. ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीन बाजार समितीच्या कार्यालयात करण्यात येणार असून प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया बाजार समिती अंतर्गत असलेल्या उपबाजार चंदनखेडा येथे राबविण्यात येणार असल्याची माहिती बाजार समिती सभापती राजु डोंगे यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावतीच्या स्थापनेनंतर प्रथमच किमान आधारभूत किंमतीनुसार चणा व तूर खरेदी केली जाणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाब ठरणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळण्यास मदत होणार आहे.
याबाबत माहिती देताना बाजार समितीचे सभापती राजू डोंगे यांनी सांगितले की, “मी सभापती पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. या खरेदीमुळे बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होईल. यापूर्वी भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी वरोरा बाजार समितीत जावे लागत होते. मात्र आता शेतकरी बांधवांना आपल्या तालुक्यातच शेतमाल विक्रीची सुविधा उपलब्ध होणार आहे.”
या निर्णयामुळे भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतमाल विक्रीसाठी लागणारा वेळ व अतिरिक्त खर्चही वाचणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या चना व तूर विक्रीसाठी नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती येथे करावी, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.



