ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- २८ फेब्रुवारी २०२६ सी. व्ही. रमण यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विदर्भ महाविद्यालय, जिवती येथे विज्ञान विभागातर्फे विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करून विज्ञान दिवस उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड आणि तर्कशुद्ध विचारसरणी विकसित करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गंगाधर लांडगे हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. गजानन राऊत आणि डॉ. श्रीकांत पानघाटे, प्रा. महेंद्र साबळे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. या मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विज्ञानाचे समाजजीवनातील महत्त्व, संशोधनाची आवश्यकता आणि नवकल्पनांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीची भूमिका यावर सखोल आणि सविस्तर विवेचन केले.

विज्ञान दिनानिमित्त महाविद्यालयात पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पर्यावरण, आरोग्य, जैवविविधता, तंत्रज्ञान, औषधी वनस्पती आदी विविध वैज्ञानिक विषयांवर अभ्यासपूर्ण पोस्टर सादर केली. विशेषतः “औषधी वनस्पती आणि त्यांची उपयोगिता” या विषयावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती संशोधनपर आणि उपयुक्त ठरली. स्थानिक परिसरातील वनस्पतींचे औषधी गुणधर्म, त्यांचा आयुर्वेदातील उपयोग आणि आधुनिक वैद्यकशास्त्राशी असलेला संबंध याचे प्रभावी सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.

स्पर्धेत बी.एस्सी. तृतीय वर्षातील कु. पलक सरोदे हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर शितल पेंदोर हिला द्वितीय क्रमांक मिळाला. या यशामागे विद्यार्थ्यांना प्रा. सचिन शिंदे यांचे लाभलेले विशेष मार्गदर्शन मोलाचे ठरले. विजेत्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. परवेझ अली यांनी करून विज्ञान दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन डॉ. वैशाली डोर्लीकर यांनी प्रभावीपणे केले. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह, सहभाग आणि शैक्षणिक बांधिलकी प्रकर्षाने जाणवली.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत होऊन संशोधनाची प्रेरणा मिळाल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये