खरीप २०२६: पीक विमा काढूनही नुकसान भरपाई नाही
सावली तालुक्यातील पालेबारसा येथील शेतकऱ्यांचा आक्रोश ; खुशाल लोडे यांच्याकडे न्यायाची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :_ खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे पालेबारसा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नियमानुसार अर्ज भरून पीक विमा काढलेला आहे, तसेच पीक विम्यासाठी आवश्यक असलेली रक्कमही भरलेली आहे. मात्र प्रत्यक्षात पिकांचे नुकसान होऊनही अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. महसूल विभागाने दुष्काळाचे पंचनामे केले, परंतु पीक विमा कंपनीने प्रत्यक्ष शेतावर येऊन पिकांचे पंचनामे करणे गरजेचे असताना ते केले नाही.
त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. संबंधित यंत्रणेकडे याबाबत योग्य ती कार्यवाही होऊनही नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर पालेबारसा येथील आपले सरकार सेतू सुविधा केंद्राचे संचालक भूषणजी मुंघाटे यांच्या सेंटरवर पीक विमा नुकसान भरपाईचे अर्ज आणि कागदपत्रे जमा करणे सुरू आहे.
दरम्यान, नुकसान भरपाई मिळावी यासाठी पालेबारसा परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विविध सेवा सहकारी संस्थे चे अध्यक्ष खुशाल लोडे यांची भेट घेत लेखी निवेदन दिले. या निवेदनात शेतकऱ्यांनी आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या –
१) आम्ही शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत नियमानुसार अर्ज भरून पीक विमा काढलेला आहे व आवश्यक रक्कम भरलेली आहे.
२)प्रत्यक्षात पिकांचे नुकसान होऊनही आम्हाला अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.
३) आर्थिक संकट ओढवले असून, यंत्रणेकडे पाठपुरावा करूनही भरपाई मिळत नसल्याने आम्ही हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करीत आहोत.
४) तरी, आमच्या अर्जाची व पीक नुकसानीची सखोल चौकशी करून प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत नियमानुसार नुकसान भरपाई मंजूर करून देण्यात यावी.
५) कोणत्याही कारणास्तव नुकसान भरपाई देणे शक्य नसेल, तर आम्ही पीक विमा काढण्यासाठी भरलेली विमा रक्कम नियमानुसार परत मिळण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी अध्यक्ष खुशाल लोडे यांनी केली आहे.
तरी आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला मदत करावी, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.
निवेदन देणारे शेतकरी – शामराव पाटील वाघरे, मनोहर पालपणकर, विठ्ठल वाढणंकर, श्री. हरिदास वाढणंकर, मानिक कोरडे, होनाजी साखरे, मंगेश कोरडे, श्री. नानाजी वाघरे,जगदीश वाघरे आदी.
याप्रसंगी अध्यक्ष खुशाल लोडे म्हणाले, “शेतकरी वाचला तर देश वाचेल. शेतकऱ्यांनी नियमानुसार विमा भरूनही त्यांना वाऱ्यावर सोडणे चुकीचे आहे. या निवेदनाच्या प्रती आम्ही तात्काळ जिल्हाधिकारी, जिल्हा निबंधक अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना देणार आहोत. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत साथ फाउंडेशन त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहील.”
दरम्यान, ज्यांनी कुणी पीक विमा भरलेला आहे, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आपले सरकार सेतू केंद्र, पालेबरसा, मु. पो. पालेबरसा, ता. सावली, जि. चंद्रपूर येथे लवकरात लवकर कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन विविध सेवा सहकारी संस्थे चे अध्यक्ष खुशाल लोडे आणि भूषणजी मुंघाटे यांनी केले आहे.



