ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसमध्ये गांजा व्यवसायाचा भंडाफोड

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : शहरातील विकास नगर परिसरात अवैधरित्या गांजा विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दि. 26.02.2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन घुग्घुसच्या हद्दीत छापा टाकून 1.700 किलो गांजा (अंदाजे किंमत 17,000 रुपये) जप्त केला. तसेच 500 रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक डिजिटल वजनकाटा देखील जप्त करण्यात आला. एकूण जप्त मालाची किंमत 17,500 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणात 34 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून एक युवक फरार असल्याची माहिती आहे. आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन घुग्घुस येथे गुन्हा क्र. 120/26 अन्वये कलम 8(C), 20(B), 29 एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र या संपूर्ण कारवाईमुळे एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे—घुग्घुस पोलिसांच्या नजरेआड विकास नगरमध्ये इतक्या काळापासून गांजा विक्रीचा व्यवसाय कसा सुरू होता? जर गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करायची होती, तर ही माहिती स्थानिक पोलिसांना आधी का मिळाली नाही? घुग्घुस पोलिसांना या अवैध धंद्याची कल्पना नव्हती का, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते?

शहरात चर्चा सुरू आहे की, जर बाहेरील शाखेला येऊन कारवाई करावी लागत असेल, तर स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. घुग्घुस पोलीस केवळ औपचारिक कामकाज करत होते का? परिसरात अमली पदार्थांचे जाळे आधीपासून सक्रिय होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

एनडीपीएस कायद्यानुसार अमली पदार्थांची विक्री हा गंभीर गुन्हा मानला जातो. वेळेत कारवाई झाली नसती, तर अनेक युवकांचे भविष्य धोक्यात आले असते, अशीही भावना व्यक्त होत आहे.

शहरातील जागरूक नागरिकांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून फरार आरोपीला तातडीने अटक करावी तसेच स्थानिक पातळीवरील देखरेखीतील त्रुटी स्पष्ट कराव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.

आता प्रशासन या प्रश्नांना ठोस उत्तर देणार का, की हा मुद्दा देखील इतर प्रकरणांप्रमाणे फाईलमध्येच दडपला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये