नवरात्री उत्सवातून सामाजिक बांधिलकीचा जागरय देवळी पोलिसांचा महिला सक्षमीकरण, आरोग्य
जागृती व व्यसनमुक्तीचा प्रभावी उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
देवळी, जि. वर्धा, शक्तीची उपासना, नारीशक्तीचा सन्मान, निरोगी समाजाचा संकल्प आणि सुरक्षित समाजनिर्मितीचा ध्यास ! नवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून देवळी पोलीस स्टेशन व उत्साही नवदुर्गा मंडळ, देवळी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड देत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक जाणीव, महिला सक्षमीकरण, युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश, आरोग्यविषयक जागरूकता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या या उपक्रमांमधून ‘जनतेच्या सुरक्षेसोबतच समाजाच्या सक्षमीकरणासाठी पोलीस सदैव तत्पर’ हा सकारात्मक संदेश दिला जात आहे.
आरोग्य शिबिरात २०० नागरिकांचा सहभाग, रक्तदान शिबिरात ५० युवक-युवतींचा सहभाग, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११ महिलांना ‘नारीशक्ती सन्मान २०२६ प्रदान करून गौरविणे, व्यसनमुक्तीपर पथनाटय ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ विषयावरील व्याख्यान, सायबर व महिला सुरक्षेबाबत मार्गदर्शन आणि महिलांसाठी आत्मसंरक्षणाची प्रात्यक्षिके अशा विविध उपक्रमांतून देवळी पोलिसांनी नवरात्री उत्सवाला सामाजिक उत्तरदायित्वाची व्यापक दिशा दिली आहे.
१. आरोग्य शिबिरातून आरोग्य जागृती
नागरिकांना आरोग्याविषयी जागरूक करणे आणि आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देणे या उद्देशाने आयोजित आरोग्य शिबिरात ह्म नागरिकांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमातून नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
२. रक्तदान शिबिरात ५० युवक-युवतींचा सहभाग
रक्तदान हे जीवनदान असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी रक्तदात्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असते. ही सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्यासाठी आयोजित रक्तदान शिबिरात हृञ् युवक-युवतींनी सहभाग नोंदविला. युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा आणि रक्तदानाबाबत समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
३. ‘नारीशक्ती सन्मान २०२६’ अंतर्गत घघ कर्तृत्ववान महिलांचा गौरव
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी ‘नारीशक्ती सन्मान २०२६ या उपक्रमांतर्गत ११ महिलांना सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव, डॉ. श्रीमती वंदना कारखेले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप कापडे उपस्थित होते.
महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेणे, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे आणि इतर महिलांना सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांत पुढे जाण्यास प्रेरित करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. नारीशक्तीचा सन्मान म्हणजे समाजाच्या प्रगतीचा सन्मान, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
४. व्यसनमुक्तीपर पथनाट्यतून युवकांचे प्रबोधन
व्यसनाचे वाढते प्रमाण आणि त्याचे व्यक्ती, कुटुंब व समाजावर होणारे दुष्परिणाम लश्वात घेऊन व्यसनमुक्तीपर पथनाट्य सादर करण्यात आले. या उपक्रमात संजय महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्स व गुजरकर सर यांनी सहभाग घेतला.
पथनाट्यच्या माध्यमातून व्यसनांमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, कौटुंबिक समस्या आणि सामाजिक नुकसान प्रभावीपणे मांडण्यात आले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळावे, असा संदेश देण्यात आला.
व्यसनाला नकार, जीवनाला स्वीकार’ या संदेशातून व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
५. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ विषयावर व्याख्यान
मुलींचे शिक्षण, संरक्षण, समान संधी आणि सक्षमीकरण याबाबत जनजागृती करण्यासाठी शुभांगी जाधव यांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या विषयावर व्याख्यान दिले.
मुलींना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, बालिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि मुलगा-मुलगी समानतेची भावना समाजात रुजविणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुलींचे शिक्षण व सक्षमीकरण ही केवळ कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
६. पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीपर चित्रकला स्पर्धा
विद्याथ्यांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम, सामाजिक जाणीव आणि सर्जनशीलता वाढविण्यासाठी पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्ती या विषयांवर चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.
चित्रांच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण, निसर्ग संवर्धन, स्वच्छता आणि व्यसनमुक्त समाजाची संकल्पना प्रभावीपणे मांडण्याची संधी विद्यार्थयांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. लहान वयातच सामाजिक प्रश्नांविषयी संवेदनशीलता निर्माण करून जबाबदार नागरिक घडविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
७. सायबर सुरक्षा व महिला सुरक्षेबाबत मार्गदर्शन
डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असताना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहणे आवश्यक आहे. याच पार्शवभूमीवर वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अंमलदार स्मिता यांनी सायबर सुरक्षा व महिला सुरक्षा या विषयांवर महीला पोलीस अंमलदार स्मिता महाजन, सायबर सेल वर्धा असे व्याख्यान देणार आहे.
ऑनलाइन आर्थिक फसवणूक, अनोळखी लिंक, ओटीपीची गोपनीयता, सोशल मीडिया अकाउंटची सुरक्षितता, वैयक्तिक माहितीचे संरक्षण तसेच महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला किंवा छळाला बळी पडल्यास योग्य वेळी पोलिसांची मदत घेण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.
८. महिलांच्या आत्मसंरक्षणासाठी प्रात्यक्षिके
महिला व मुलींमध्ये आत्मविश्वास वाढविणे आणि संकटाच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कौशल्यांची माहिती देणे या उद्देशाने वर्धा येथील वाघ सर यांच्या पथकाने आत्मसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहे.
या प्रात्यक्षिकांमधून महिलांनी संभाव्य धोक्याच्या परिस्थितीत प्रसंगावधान राखणे, स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, मदत मागणे आणि स्वसंरक्षणासाठी आवश्यक तंत्रांचा वापर करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी निर्भयपणे व आत्मविश्वासाने समाजात वावरावे, हा या उपक्रमाचा मुख्य संदेश देण्यात येणार आहे.
समाज प्रबोधनातून सुरक्षित, सशक्त व व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संकल्प
नवरात्री उत्सवाच्या माध्यमातून देवळी पोलीस स्टेशन व उत्साही नवदुर्गा मंडळ, देवळी यांच्या वतीने राबविण्यात येणारे हे उपक्रम पोलीस विभागाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच नागरिकांशी संवाद साधणे, सामाजिक समस्यांविषयी जनजागृती करणे, महिलांना सक्षम बनविणे, युवकांना सकारात्मक दिशा देणे आणि समाजात सुरक्षिततेची भावना दृढ करणे, या व्यापक उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
धार्मिक उत्सवातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश देत महिला सन्मान, आरोग्य जागृती, रक्तदान, सायबर सुरक्षा, आत्मसंरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्ती या विषयांवर जनजागृती करण्याचा अभिनव प्रयत्न देवळी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे.
या सामाजिक उपक्रमांना नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन देवळी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे तसेच या कार्यक्रमाकरीता कॅन्सर तज्ञ व महीला आरोग्य तज्ञ या सुध्दा हजर राहुन मौलाचे मार्गदर्शन करणार आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक, श्री सौरभ कुमार अग्रावल सा. (भापोसे), मा. अप्पर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे सा, मा उप विभागीय पोलीस अधिकारी श्री वंदना कारखेले सा (मपोसे) उप विभाग पुलगाव, यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्री संदिप कापडे तसेच पोलीस स्टेशन देवळी येथील अधिकारी व अंमलदार तसेच उत्साही शक्तीपीठ दुर्गा पुजा मंडळ देवळी, चे अध्यक्ष तसेच सदस्यांनी केलेली आहे.



