रेल्वेच्या विद्युत पोलला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
भांदक रेल्वे स्टेशन गेट क्रमांक ३६ जवळील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भांदक रेल्वे स्टेशन परिसरात वर्धा बल्लारशाहा रेल्वे लाईन व सायडिंग चे काम सुरू असल्याने मध्यप्रदेश व इतर राज्यातील मजूर इथे हंगामी रोजगारा करीता आले आहेत .रेल्वे परिसरात ते आपल्या मुलाबाळा सहीत झोपड्यात वास्तव्यास आहेत. दिनांक १४ रोजी रेल्वे गेट क्रमांक ३६ च्या जवळ विद्युत वाहिनी पोल क्रमांक ८५२ B,३४ AI वर एका युवकाने मानेला दुपट्टा गुंडाळून आत्महत्या केली असल्याचे आढळून आले.
चौकशी केली असता सदर युवकाचे नाव दुर्गेश प्रसाद मसराम वय.१८ मूळ राहणार ग्राम. कोको बिच्छया तहसील. जिल्हा. मंडला (मध्यप्रदेश) असून तो आपल्या कुटुंबासोबत कामाकरीता आलेला होता. आज पहाटे घरच्या लोकांना दुर्गेश घरी आढळून न आल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला असता सदर युवक रेल्वे लाईनवर गळफास घेतलेल्या मृत अवस्थेत आढळून आला. घटनास्थळावरून अधिक माहिती घेतली असता सदर युवक आपल्या आई वडिलांसोबत मोलमजुरीचे काम करीत होता.
घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र हि घटना मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असल्याने पुढील तपास रेल्वे विभाग आर. पी. एफ करीत आहे. युवकाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय भद्रावती इथे हलविण्यात आले असून मृतकाच्या शवविच्छेदन अहवाला नंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
तूर्तास मृत्यूचे कारण अद्याप कळले नाही.



