विद्युत शॉकने जखमी झालेल्या अथर्वला अल्का आत्राम यांचा मदतीचा हात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
आंबेधानोरा :_ येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेणारा विद्यार्थी अथर्व अरविंद कोवे हा खेळत असताना अनावधानाने विद्युत शॉक लागून गंभीर जखमी झाला. या अपघातात अथर्व मोठ्या प्रमाणात भाजला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच आंबेधानोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता मडावी यांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर अल्का आत्राम यांनी तात्काळ अथर्वच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले व विद्यार्थ्याला तात्काळ वैयक्तिक आर्थिक मदत दिली.
अथर्व हा विद्यार्थी असल्याने त्याला राजीव गांधी अपघात विमा योजनेचा लाभ मिळू शकतो. यासाठी गट शिक्षणाधिकारी व संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक प्रस्ताव तात्काळ जिल्हा परिषदेकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.



