ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्य सचिवांकडून आनंदवनातील उपक्रमांचे कौतुक

कुष्ठरुग्ण व दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत संवाद

चांदा ब्लास्ट

थोर समाजसेवी व पद्मश्री पुरस्कार प्राप्त बाबा आमटे यांनी आनंदवन (ता. वरोरा) येथे स्थापन केलेल्या विविध उपक्रमांना राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी बुधवारी (दि. 21) भेट दिली. डॉ. विकास आमटे यांच्या नेतृत्वात महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून कुष्ठरुग्णांच्या सेवेसोबतच येथील प्रत्येक नागरिकांच्या हाताला काम व विविध प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसीत होत आहे, हे अतिशय कौतुकास्पद असल्याचे मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले. यावेळी त्यांनी कुष्ठरुग्ण व दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत मनमोकळेपणे संवाद साधला.

या भेटीदरम्यान नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्षमी बिदरी, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, वरोराचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मिना साळूंके, महारोगी सेवा समितीच्या अंतर्गत व्यवस्थापन प्रमुख पल्लवी कौस्तुभ आमटे, विश्वस्त सुधाकर कडू, सदाशिव ताजणे, जनसंपर्क अधिकारी राजेश ताजणे आदी उपस्थित होते.

संधीनिकेतन दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या फलकाचे अनावरण करून मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. अंधविद्यार्थीनी ऋतिका हिची आपुलकिने विचारपूस करतांना, तुझे नाव काय, कुठे राहते, कोणत्या वर्गात आहे, तुला जेवणामध्ये व खेळामध्ये काय आवडते आदी बाबी जाणून घेतल्या. तर अक्षरा गारघाटे या अंध विद्यार्थीनीने सादर केलेले ‘तु बुध्दी दे….तु तेज दे….नवचेतना विश्वास दे…’ या गीताचे मुख्य सचिवांनी भरभरून कौतुक केले.

यावेळी त्यांनी ग्रंथालय, संगणक विभाग, शिवणकला विभागात विद्यार्थ्यांनी शिवलेले कपडे, ॲनी स्मार्ट क्लास, इलेक्ट्रॉनिक विभाग, प्रशिक्षण कक्ष, प्रदर्शनी व विक्री केंद्रातील विविध कलाकृती, काष्ठशिल्प युनीट, वर्कशॉप, हॅन्डलूम विभाग, संगीत कला अकादमी, रुग्णालय आदींची पाहणी केली व तेथील विद्यार्थी आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे यांची भेट घेऊन चर्चा केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये