आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील भव्य श्रीरामकथेला अलोट गर्दी
पूज्य राजन महाराजांच्या रसाळ वाणीने लखमापूर धाम भक्तिरसात चिंब

चांदा ब्लास्ट
‘रामधर्माचा’ जागर; जनसागराचा अभूतपूर्व प्रतिसाद
चंद्रपूर : गेल्या आठ दिवसांपासून चंद्रपूर नगरीत वाहाणारा भक्तीच्या कुंभमेळ्यात अलोट गर्दी होत आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आयोजित लखमापूर धाम चांदा क्लब ग्राऊंडवरील भव्य श्रीरामकथेचा उद्या, गुरुवार दि. २२ जानेवारीला महाआरतीने दिमाखदार समारोप होईल. १४ जानेवारीपासून सुरू झालेल्या या ज्ञानयज्ञाने केवळ चंद्रपूरचेच नव्हे, तर विदर्भाचे आध्यात्मिक वातावरण चैतन्यमयी केले आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राजकारणापलीकडे जाऊन समाजमनावर सुसंस्कारांची पेरणी करण्यासाठी केलेल्या या भव्य आयोजनाला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्रीरामकथेचे आयोजन केवळ एक धार्मिक सोहळा नसून, एक सांस्कृतिक उपक्रम ठरत आहे. विशेष म्हणजे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार हे सपत्नीक दररोज या कथेला उपस्थिती लावून इतरांनाही प्रेरणा देत आहे.
“रामकथा ही समाजाला एकत्र बांधणारी आणि मूल्यसंवर्धन करणारी परंपरा आहे,” हा त्यांचा विचार या कार्यक्रमाच्या भव्यतेतून प्रत्यक्ष साकारत आहे. पूज्य राजन महाराज यांच्या रसाळ वाणीतून रामानामाच्या घोषात मोठ्या भक्तीभावाने रामकथा रोज संपन्न होत आहे. या रामकथेला हजारो भाविक रामानामात राममय झाले आहेत.चंद्रपुरात सुरू असलेल्या रामकथेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण सुरू असल्याने राज्यभरातील रामभक्तांना घरबसल्या कथाकार पूज्य राजन महाराज यांच्या ओजस्वी व अमृतमय वाणीचा थेट लाभ मिळत आहे.
प्रसिद्ध प्रवचनकार पूज्य राजन महाराज यांनी आपल्या अमोघ वाणीने श्रीरामांच्या जीवनातील प्रसंग जिवंत केले. “धनासोबतच परमार्थाचीही साधना करा” हा त्यांनी दिलेला मंत्र चंद्रपूरकरांच्या मनावर कोरला गेला. बाललीला, सीता स्वयंवर, वनवास आणि रामराज्याचे वर्णन करताना महाराजांच्या ओघवत्या शैलीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विशेषतः आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कथेच्या आयोजनात ठेवलेली शिस्त, भव्य व्यासपीठ आणि मनमोहक विद्युत रोषणाई यामुळे चांदा क्लब ग्राऊंडवर खऱ्या अर्थाने अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.
मकर संक्रांतीला श्रीरामकथेला प्रारंभ झाला. या आठ दिवसांत केवळ कथाश्रवणच झाले नाही, तर सामाजिक सलोख्याचेही दर्शन घडले. विविध समुदायांच्या नागरिकांनी एकत्र येऊन केलेली आरती हा या सोहळ्याचा विशेष भाग ठरला. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाने चंद्रपूरच्या आध्यात्मिक इतिहासात एक सुवर्णपान जोडले जात आहे.



