दगडवाडीतील शेत रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला
प्रशासनाच्या हस्तक्षेपाने शेतकऱ्याला न्याय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे दगडवाडी येथील शेतकरी शिवानंद जायभाये यांच्या मालकीच्या शेत गट क्रमांक १३५ मध्ये जाणाऱ्या शेत रस्त्याचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न अखेर सुटला आहे. नायब तहसीलदार, महसूल देऊळगाव राजा यांचे दि. १ एप्रिल २०२५ चे आदेश व माननीय उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा यांचे दि. ६ जानेवारी २०२६ चे आदेश यांच्या अनुषंगाने दि. २० जानेवारी रोजी संबंधित शेत रस्ता अधिकृतपणे खुला करण्यात आला.
सदर शेत रस्ता गट क्रमांक १४१, १४९, १३७ तसेच गट क्रमांक १३५ च्या धुर्यावरून जात असून, रस्ता बंद असल्यामुळे अर्जदार शेतकऱ्याला शेती मशागत, पिकांची वाहतूक व दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईतून हा रस्ता खुला करण्यात आला.
शेत रस्ता खुला करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोक्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मंडळाधिकारी विजय हिरवे, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे, हेड पोलीस कॉन्स्टेबल विश्वनाथ काकड, ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर तांबे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर वायाळ, महिला पोलीस कॉन्स्टेबल मीना घुगे यांच्यासह विकास भानुदास घुगे, योगेश शिवाजी घुगे, संतोष नारायण घुगे तसेच इतर पंच प्रत्यक्ष उपस्थित होते.
या कारवाईमुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला असून, प्रशासनाने न्याय दिल्याबद्दल गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शेत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने आता संबंधित शेतकऱ्याला शेती कामे सुरळीतपणे करता येणार असून, भविष्यातील वाद टळण्यास मदत होणार आहे.



