निमणी येथील शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या
नापिकी अनं कर्जाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना तालुक्यातील निमणी येथील शेतकऱ्याने नापिकी अनं कर्जाला कंटाळून शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दिनांक १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. पद्माकर लक्ष्मण पिदुरकर (५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
यांना सुमारे १ हेक्टर ७ आर शेती आहे. या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या शेतीवर त्यांनी भारतीय स्टेट बँक लखमापूरचे १ लाख कर्ज घेतले आहे. दरवर्षी शेतात कापूस व इतर पिके घेतात.मात्र या वर्षात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले होते त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. सततची नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा याची चिंता त्यांना लागली होती.
दरम्यान आज सकाळी सर्व जण घरी असतांना ते गावाला लागून असलेल्या शेतात जाऊन सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांनी विषारी औषध पिऊन घरी जायला निघाले असता चौकात पडल्याने सदर प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पद्माकर पिदुरकर यांना तातडीने उपचारासाठी गडचांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर त्यांचा मृ्त्यू झाल्याचे घोषित केले.पुढील तपास गडचांदुर पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई सिद्धार्थ रणवीर सुरेश राठोड करीत आहे.



