ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकाचा आमरण उपोषणाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 भद्रावती तालुक्यातील पिपरी–तेलवासा–ढोरवासा ते सुमठाना (कोची घोणाड मुरसा) या मार्गाच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाची मागणी वारंवार करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने ढोरवासा येथील ग्राम पंचायत उपसरपंच तथा वरोरा भद्रावती विधानसभा अध्यक्ष युवा – सेना (शिंदे गट) मुनेश्वर बदखल यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

सदर रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर रेती वाहतूक करणारे हायवा ट्रक व अवजड वाहने चालत असल्याने रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. परिणामी या मार्गावर वारंवार अपघात होत असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. महिलांनाही अपघातांना सामोरे जावे लागले आहे.

या संदर्भात बदखल यांनी तहसिल कार्यालयाकडे अनेकदा निवेदने सादर केली. तसेच अपघातग्रस्त महिलेला तहसिलदारांसमोर हजर करून वस्तुस्थिती दाखवून दिली. मात्र तरीही संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस पाऊल उचलल्या गेले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे नाईलाजाने दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी भद्रावती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतल्याचे मुनेश्वर बदखल यांनी निवेदनात म्हटले आहे. जोपर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण केले जात नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

या प्रकरणाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये