ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हाधिका-यांकडून ब्रम्हपुरी तालुक्यातील विविध विकास कामांची पाहणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध विकासकामांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षण केले. यावेळी ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार सतीश मासाळ, तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ब्रह्मपुरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, कामामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित यंत्रणांनी तात्काळ काम पूर्ण करावे, तसेच धुळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना कार्यकारी अभियंता व संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्या.

यानंतर मौजा ब्रह्मपुरी ते आरमोरी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करण्यात आली. सदर काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी असमाधान व्यक्त करून, विहित कालमर्यादेत काम पूर्ण करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) जया ठाकरे, उपविभागीय अभियंता अजय चहांदे व संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिले. त्यानंतर मौजा उदापूर येथे माहे नोव्हेंबर 2025 मध्ये आग लागलेल्या इथेनॉल प्लांटला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. यावेळी सुरक्षा व्यवस्थेबाबत आवश्यक खबरदारी घेण्याबरोबरच, परिसरातील लगतच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

ब्रह्मपुरी तालुक्यात प्रस्तावित झुडपी जंगल प्रकरणासंदर्भात विविध गावांना भेट देऊन कामाची पाहणी करण्यात आली. मौजा गांगलवाडी येथील स्मार्ट पीएचसी तसेच बचत गटाच्या कार्यालयास भेट देण्यात आली. मौजा मेंडकी येथील बळीराजा पाणंद रस्ता, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सायन्स पार्क व मॉडेल स्कूलबाबत निरीक्षण करण्यात आले. तसेच मेंडकी येथील स्मशानभूमी रस्त्यालगत करण्यात आलेल्या बांबू लागवडीच्या कामाचीही पाहणी करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये