अपयशातही यशाचा संकल्प करण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये तयार करा
आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे शिक्षक-प्रशिक्षकांना आवाहन

चांदा ब्लास्ट
उथळपेठ येथे बीट स्तरीय बाल क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन
चंद्रपूर :- क्रीडा स्पर्धा म्हटल्यावर एकाचा विजय होणार तर दुसऱ्याचा पराभव होणार. पण अपयश आल्यानंतर दुसऱ्याच्या यशामध्ये आनंद शोधता आला पाहिजे. अपयशातच यशाचा संकल्प मनात करण्याची आणि उद्याचा दिवस माझा असेल असा निर्धार करण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये तयार करण्याची जबाबदारी शिक्षक-प्रशिक्षकांनी पार पाडावी, यातूनच विद्यार्थी घडत असतो, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज, मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी उथळपेठ येथे केले.
उथळपेठ येथे बीट स्तरीय बाल क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उथळपेठ ग्रामपंचायतचे सरपंच पलिंद्र सातपुते, मुल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर शिंदे, गटशिक्षणाधिकारी जयश्री गुज्जनवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरधर चिचघरे, उपाध्यक्ष गणेश चिचघरे, उपसरपंच भारती पिंपळे, ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी बुरांडे, अर्चना चिचघरे, श्रीकांत बुरांडे, सुरेंद्र चिचघरे, वर्षा वाढई, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गोपाल चिचघरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य शितल बुरांडे, ज्योत्स्ना वाडगुरे, निलेश बुरांडे, प्रवीण सातपुते, अल्का शेडमाके, रोशन चिचघरे, पोलीस पाटील भाग्यश्री चिचघरे, उथळपेठ ग्रामपंचायत सचिव साईनाथ कंबलवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तीन दिवसीय या स्पर्धेमध्ये चिचाळा बीटातील २१ शाळांमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल आमदार श्री. मुनगंटीवार यांनी कौतुक केले. विशेष म्हणजे आ. मुनगंटीवार यांनी स्पर्धेसाठी विशेष बक्षीस जाहीर केली.
आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘राज्यात उथळपेठ गावाने १०० टक्के सोलार ग्राम म्हणून निर्माण केलेली ओळख कौतुकास्पद आहे. सुसज्ज ग्रामपंचायत इमारत आणि गावातील भौतिक सुविधा तसेच सीसीटीव्ही कॅमेरा व्यवस्था यांसाठी उथळपेठला आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त झाले. माझ्या बल्लारपूर मतदारसंघातील गाव असल्याचा मनापासून अभिमान आहे. हे सर्व गावकऱ्यांच्या एकजुटीचे जिवंत उदाहरण आहे. आता उथळपेठ या ऊर्जाग्राममधून ज्ञानाची ऊर्जा आणि प्रेमाची उब घेऊन उथळपेठ येथील विद्यार्थी मोठी स्वप्ने पाहत आहे. आपल्या क्रीडा कौशल्यातून उथळपेठ गावाचा व बल्लारपूर मतदारसंघाचा मान वाढविण्यात निश्चित यशस्वी होईल असा विश्वास आहे.’
पहिल्यांदा गावे छोटी होती, पण माणसाचे मन मोठे होते. आता गावे मोठी झाली, पण माणसांची मने छोटी झाली. पण उथळपेठ गाव त्याला अपवाद आहे. हे गाव तर मोठे होतच आहे, शिवाय येथील मनही मोठे आहे, असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी स्वतः नगरपरिषद व जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतले आहे. आपण कुठे शिकलो यापेक्षा, किती एकाग्रतेने आणि मनापासून शिकतो हे अधिक महत्त्वाचे आहे. लहानपणापासून आपण एकलव्याची कथा ऐकतो जे अर्जुनाला जमले नाही, ते एकलव्याने साध्य केले. मग जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना का जमू नये? योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि आत्मविश्वास असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातून यश नक्कीच घडू शकते, असे त्यांनी नमूद केले. यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी लहान शालेय विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी आर्थिक मदत दिली.



