आ. जोरगेवार यांच्या हस्ते प्रभाग १७ मध्ये महायुतीच्या उमेदवार प्रतिभा ठाकूर यांच्या प्रचार कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

चांदा ब्लास्ट
प्रभाग क्रमांक १७ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये भाजप–शिवसेना युतीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा ठाकूर यांच्या प्रचार कार्यालयाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी उद्घाटन प्रसंगी शिवसेना (शिंदे गट) चे पूर्व विदर्भ संघटक व ज्येष्ठ नेते किरण पांडव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासह महायुतीचे पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
या प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणे, तसेच विकासाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, हा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. महायुतीच्या माध्यमातून नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प उपस्थित नागरिकांनी केला.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर हा सामाजिक सलोखा, संघर्ष आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेला परिसर आहे. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे. प्रतिभा ठाकूर या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या, काम करण्याची जिद्द असलेल्या उमेदवार असून त्या नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाशी आपुलकीने जोडल्या गेलेल्या आहेत. आज उद्घाटन होत असलेले हे प्रचार कार्यालय केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून, येथील नागरिकांच्या अडचणी ऐकण्याचे व त्यावर ठोस उपाययोजना करण्याचे केंद्र बनेल. पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण अशा मूलभूत प्रश्नांवर महायुती प्राधान्याने काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य व केंद्र सरकारच्या विकास योजनांचा थेट लाभ या प्रभागातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करू. नागरिकांचा विश्वास, कार्यकर्त्यांची ताकद आणि महायुतीची एकजूट याच्या जोरावर प्रभाग क्रमांक १७ मध्ये निश्चितच विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असे ते यावेळी म्हणाले.



