राजकीय अनास्थेमुळे मेंडकी तालुका निर्मितीचा प्रश्न ऐरणीवर!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून मेंडकी गावं ओळखले जाते.मागील ३० वर्षांपासून मेंडकीला तालुका घोषीत करण्याची मागणी खितपत पडली आहे त्यामुळे ४५ गावातील विकास खूंटला आहे.या गावाच्या विकासासाठी मेंडकी तालुका होणे आवश्यक आहे.मागील१० वर्षांपूर्वी मेंडकी तालुका निर्माण संघर्ष समितीच्या पुढाकाराने डॉ.थानेश्वर कायरकर यांच्या नेतृत्वाखाली मेंडकी तालुका निर्मितीसाठी पाठपुरावा केला होता.तेव्हा तालुका होण्याची आशा पल्लवित झाली होती.परंतु राजकीय उदासीनतेत गावांचा विकास होत नसल्याची ओरड होऊ लागली आहे.
ब्रम्हपुरी तालुक्याचे विभाजन झाले तेव्हा नागभिड आणि सिंदेवाही तालुक्याची निर्मिती झाली .मेंडकी शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर असताना या गावाला मोठा राजकीय नेता लाभला नाही.त्यामुळे मेंडकी तालुक्याची मागणी खितपत पडली आहे. त्यामुळे या भागाचा अपेक्षीत विकास झाला नाही.मेंडकीची लोकसंख्या १० हजारच्या जवळपास आहे अवघ्या ९ किमी वर गांगलवाडी आवळगाव आणि मुडझा हि मोठी गावं आहेत. मेंडकीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय, २ माध्यमिक शाळा,२ कॉन्व्हेट सिंचन कार्यालय, मंडळ कार्यालय, वन विभागाचे उपकार्यालय, पोलीस सबस्टेशन,विज वितरण कार्यालय, सहकारी भात गिरणी,३ खाजगी भात गिरणी,कोषा उत्पादन कार्यालय, आदींसह अनेक कार्यालये आहेत.गावालगतच्या ९ ते१० किमी परिघात ४० ते ४५ गावे आहेत.
डॉ.थानेश्वर कायरकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने, दोनदा आमरण उपोषणे झालीत परंतु शासनाने आश्वासनापलीकडे काहीच केले नाही.मेंडकी तालुका झाल्यास तालुक्याशी निगडित सर्व कामे करणे या परीसरातील नागरीकांना सोईचे होवून श्रम व वेळ वाचेल आणि गावांचा विकास होईल.मेंडकीला तालुका दर्जा मिळण्यासाठी प्रतिक्षेत आणखी किती काळ घालवला लागणार आहे हे येणारा काळच ठरविणार आहे.



