ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१५ जानेवारी तारीख लक्षात आहे ना? / जनजागृती बाईक रॅली

स्वीप अभियानाअंतर्गत महानगरपालिकेतर्फे मतदान जनजागृती बाईक रॅली

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मध्ये मतदारांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वीप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) अभियानाअंतर्गत आज सकाळी ९ वाजता मतदान जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

   ‘१५ जानेवारी तारीख लक्षात आहे ना?’ असा उद्घोष करणारी ही रॅली जिल्हाधिकारी मा. विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी मा. पुलकित सिंह तसेच महानगरपालिका आयुक्त मा. अकुनुरी नरेश यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून गांधी चौक येथून प्रारंभ करण्यात आली.

   महानगरपालिका निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये विविध माध्यमांतील प्रसिद्धी, नागरिकांशी थेट संवाद, पथनाट्य, रांगोळी, चित्रकला, निबंध, प्रश्नमंजुषा, रील्स, सेल्फी आदी स्पर्धा व उपक्रमांचा समावेश आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

   रॅलीदरम्यान मतदान जनजागृतीचा संदेश देणारे फुगे (बॅलून्स) आकाशात सोडण्यात आले. तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी स्वाक्षरी बॅनर मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमास महिला व पुरुष नागरिकांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीमध्ये अग्निशमन दलाच्या गाड्यांचाही सहभाग असून, त्यावरून मतदान जनजागृती करणारी गाणी वाजविण्यात येत होती.

   ‘१५ जानेवारी लक्षात आहे ना?’, ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो…’, ‘मतदान हा तुमचा अधिकार आहे…’, तसेच ‘येत्या १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीत नक्की मतदान करा…’ अशा घोषणांद्वारे नागरिकांना मतदानासाठी प्रेरित करण्यात आले.

   गांधी चौक येथून सुरू झालेली ही रॅली जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, वरोरा नाका, जनता कॉलेज चौक, ट्रॅफिक ऑफिस चौक, सावरकर चौक, बंगाली कॅम्प चौक मार्गे पुन्हा प्रियदर्शिनी चौक, जटपुरा गेट, गिरनार चौक असा मार्गक्रमण करत चंद्रपूर महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत पोहोचली. रॅलीदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

   यावेळी लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मताचे असलेले महत्त्व, मतदान न केल्यास होणारे परिणाम तसेच जबाबदार नागरिक म्हणून मतदान करण्याची आवश्यकता याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. संदीप रामटेके तसेच रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचा सक्रिय सहभाग लाभला.

    याप्रसंगी जिल्हाधिकारी मा. विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी मा. पुलकित सिंह, महानगरपालिका आयुक्त मा. अकुनुरी नरेश, अतिरिक्त आयुक्त मा. चंदन पाटील, उपायुक्त व स्वीपचे नोडल अधिकारी मा. संदीप चिद्रावार, सहायक आयुक्त मा. शुभांगी सूर्यवंशी, शहर अभियंता मा. रवींद्र हजारे, नगरसचिव मा. नरेंद्र बोबाटे, सहायक आयुक्त मा. अनिल घुले, श्री. संतोष गर्गेलवार तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये