सावित्रीबाईंच्या विचारांना अभिवादन : नालंदा बौद्ध विहार समितीचा उपक्रम
नवनियुक्त नगरसेवक – नगरसेविकांचा सत्कार

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
राजेंद्र मर्दाने, वरोरा
वरोरा : येथील सरदार पटेल वॉर्डातील नालंदा बौद्ध विहार समितीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती बौद्ध विहार सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सरदार पटेल व मालवीय प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मंचावर माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मर्दाने, रंजना पिसाळ, नवनिर्वाचित नगरसेवक बंडू देऊळकर, राहुल देवडे, नंदिनी आत्राम, वर्षा पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली.
यावेळी आपल्या मनोगतात नंदिनी आत्राम म्हणाल्या की, आज महिलांना स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार मिळाला आहे, यामागे सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाची व संघर्षाची प्रेरणा आहे. वर्षा पिसाळ यांनी सांगितले की, आजची महिला केवळ गृहिणी नसून विविध क्षेत्रात अग्रसर आहे, कारण त्या अंधारलेल्या काळात सावित्रीबाईंनी ज्ञानाचा दिवा पेटवला. अपमान, उपेक्षा सहन करतही त्यांनी शिक्षणाचा मार्ग सोडला नाही.
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मर्दाने यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी अविद्येचे अनर्थ ओळखून त्या काळात शिक्षणाचा मार्ग स्वीकारत समाज परिवर्तनाचा पाया घातला. सावित्रीबाई फुले केवळ शिक्षिका नव्हत्या, तर अन्यायाविरुद्ध उभी ठाकलेली एक जिवंत क्रांती होत्या, असे त्यांनी नमूद केले.
नवनिर्वाचित नगरसेवक राहुल देवडे व बंडू देऊळकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकत वॉर्डातील समस्या सोडविण्यासाठी शंभर टक्क्यांहून अधिक योगदान देण्याची ग्वाही दिली.
प्रास्ताविकात विशाल जुमडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी प्रतिभा देडगे व रुपाली झिलटे यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित कवितेचे वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल जुमडे यांनी केले तर आभार कोमल कोसमकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नालंदा बौद्ध विहार समितीचे संयोजक – विशाल जुमडे, निशांत कोसमकर, दर्शन मोहिते, विशाल दारुंडे, समितीच्या अध्यक्षा राखी ताकसांडे, उपाध्यक्षा सविता जुमडे, शिल्पा मोहिते, सचिव – कोमल कोसमकर, सहसचिव प्रतिभा देडगे, सदस्य माया जवादे, रेखा ठमके, रूपाली झिलटे, शोभा खोब्रागडे, सोनाली कोसमकर, शोभा शेंद्रे, तेजस्विनी करमरकर, विलास जवादे, सुनील जवादे आदी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



