गुरुकुल महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नांदा येथील गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे वाणिज्य विभागातर्फे दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अनिल मुसळे हे होते. या कार्यक्रमाला गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव डॉ. अनिल मुसळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्त्री शिक्षणाला पूर्णपणे विरोध असताना सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले प्रयत्न हे केवळ अनन्य साधारण आहेत. आज उच्च शिक्षण घेऊन स्त्रिया विविध क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले यांनी जर त्या काळात मुलींच्या शिक्षणासाठी अथक प्रयत्न केले नसते तर आजसुद्धा स्त्रिया केवळ चूल आणि मुल सांभाळण्यापर्यंतच मर्यादित राहिल्या असत्या, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना सावित्रीबाई फुले यांना सोसाव्या लागलेल्या अत्यंत कठीण परिस्थितीवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. प्रफुल मुसळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुकुल महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



