ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती येथील एचएसआरपी नंबर प्लेट केंद्र सुरू करा!

आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे निवेदनातून मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती : अतिदुर्गम भागात मोडणाऱ्या जिवती येथे सुरू असलेले एफटीए एचएसआरपी कंपनीचे उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) केंद्र अचानक बंद झाल्याने स्थानिक वाहनधारकांच्या अडचणी वाढल्या आहेत. शासकीय नियमांनुसार ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत एप्रिल २०१९ च्या पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना ही प्लेट लावणे बंधनकारक केले असताना तालुक्यात एकमेव सोयीस्कर केंद्र अचानक बंद झाल्याने वाहनधारकांना इतर तालुक्यातील केंद्रावर जावे लागत आहे.त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

जिवती येथील एफटीए कंपनीच्या श्रेया मोटर्स येथील केंद्रात पूर्वी एचएसआरपी प्लेट्सची बसवणी सुरळीत चालू होती. मात्र, कोणतीही पूर्वसूचना किंवा स्पष्ट कारण न देता कंपनीने हे केंद्र अचानक बंद केले आहे. त्यामुळे तालुक्यातील वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. केंद्रात दररोज फक्त १० प्लेट्स बसवण्याचे मर्यादित टार्गेट असल्यानेही रांगा वाढत होत्या, तरीही ते बंद झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.याबाबत राजुरा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार देवराव भोंगळे यांना या बाबत माहिती देऊन बंद केलेले एचएसआरपी नंबर प्लेटचे केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, शासकीय धोरण बंधनकारक असताना केंद्र बंद झाल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. एकीकडे मुदत संपत आली आहे, तर दुसरीकडे केंद्रच उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत वाहनधारकांनी काय करावे? बंद केंद्र पुन्हा सुरू करण्यात यावे आणि दैनिक टार्गेट वाढवावे, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट अनिवार्य आहे. राज्य परिवहन विभागाने कमकुवत प्रतिसादामुळे मुदत अनेकदा वाढवली असून, सध्या ती ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आहे. मुदत संपल्यानंतर दंड आणि कारवाई होऊ शकते.म्हणून आमदार भोंगळे यांनी या प्रकरणी लक्ष घालून योग्य तोडगा काढावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये