गुरुकुल महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नांदा येथील गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे घेण्यात आला.याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सचिन कर्णेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेश डोंगरे यांनी संत गाडगेबाबा यांनी केलेल्या महान कार्याचा उल्लेख केला. संत गाडगेबाबा यांनी आपल्या जीवनात स्वच्छतेला प्राथमिक महत्त्व दिले. तसेच अंधश्रद्धेसारख्या वाईट प्रवृत्तींचा नायनाट व्हावा यासाठी अनेक ठिकाणी प्रवचने केली. आजच्या आधुनिक युगातसुद्धा अनेक व्यक्ती अंधश्रद्धेसारख्या वाईट प्रवृत्तींचे गुलाम झाल्याचे आढळून येते. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे, असे मत डॉ. डोंगरे यांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुकुल महाविद्यालय, नांदा येथील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांनी परिश्रम घेतले.



