ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सज्जन शक्ती एकत्र येणार – आ. जोरगेवार

माजी नगरसेवकांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

चांदा ब्लास्ट

वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरतर्फे आयोजित करण्यात आलेला हा पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम माझ्यासाठी अत्यंत भावनिक, आनंदाचा आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. आज हा दिवस पक्षवाढीचा, विचारवाढीचा आणि लोकशक्ती एकत्र आणणारा दिवस ठरला, याचा मला विशेष अभिमान वाटतो. चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष हाच एकमेव पर्याय असून, यासाठी सर्व सज्जन शक्ती एकत्र येणार आहेत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

नव्याने सुरू करण्यात आलेल्या गांधी चौकाजवळील मिलन चौकातील भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या कार्यालयात भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, माजी महापौर राखी कंचर्लावार, रघुवीर अहिर, भाजप नेते प्रकाश देवतळे, दशरथसिंह ठाकूर, महामंत्री मनोज पाल, सविता दंढारे, श्याम कणकम, नामदेव डाहुले आदींची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी विविध पक्षांतील तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केला. यात माजी नगरसेवक अनिलजी दडमल, शिवसेना युवासेनेचे विभागीय अध्यक्ष निलेश बेलखेडे, किसान काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष भालचंद दानव, वैशाली सचिन पाटील, डॉ. प्रा. संजीव दादाजी खोब्रागडे, आरपीआय (आठवले) चे जिल्हा युवा उपाध्यक्ष अमितकुमार सरकार, जिल्हा सरचिटणीस प्रकाश मडावी, माजी नगर सेवक पितांबर कश्यब, संगपालजी गेडाम, रजत टेंभुर्णे, अलका अविनाश जिंजीलवार तसेच विद्यार्थी चळवळीतील लढवय्ये नेतृत्व प्रलय म्हशाखेत्री यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम, दूरदृष्टीपूर्ण आणि विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून आज अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत सहभागी होत आहेत, ही बाब देश व राज्य योग्य दिशेने जात असल्याचा ठोस पुरावा आहे. भाजपा ही केवळ राजकीय पक्ष नाही, तर सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्मितीची चळवळ आहे.

आज पक्षात प्रवेश करणारे सर्व सहकारी हे समाजाशी जोडलेले, जनतेसाठी काम करणारे आणि परिवर्तनाची आस असलेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या ताकदीचा आणि त्यांच्या विचारांचा पक्षाला निश्चितच फायदा होईल. चंद्रपूरचा सर्वांगीण विकास, युवकांचे भविष्य, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय या सर्व विषयांवर आपण सर्वजण एकत्रितपणे काम करू, असा मला पूर्ण विश्वास आहे. भारतीय जनता पार्टीत कार्य करताना पदापेक्षा कर्तव्य मोठे आहे. सत्ता नव्हे, तर सेवा हेच आपले ध्येय आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणे हीच खरी राजकारणाची परीक्षा असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये