भारतीय जनता पक्षातर्फे मनपा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

चांदा ब्लास्ट
आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती आज गुरुवारी एन. डी. हॉटेल आणि बुरटकर सभागृह येथे घेण्यात आल्या. या मुलाखतींचे आयोजन पक्षाच्या वतीने शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. रात्री ७ वाजेपर्यंत सात प्रभागांतील २७५ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. रात्री उशिरा पर्यंत या मुलखाती चालणार आहे.
या मुलाखती महाराष्ट्र प्रदेशाचे निवडणूक प्रभारी आमदार चैनसुख संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आल्या. तत्पूर्वी सर्व इच्छुक उमेदवारांना मान्यवरांनी संबोधित केले. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, ज्येष्ठ नेते विजय राऊत, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष हरीश शर्मा, ओबीसी नेते अशोक जीवतोडे, महिला आघाडी अध्यक्ष छबु वैरागडे, माजी महापौर राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर, महामंत्री सविता दंढारे, रविंद्र गुरुनुले, माजी महानगर अध्यक्ष राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, माजी महिला आघाडी अध्यक्ष सविता कांबळे यांची विशेष उपस्थिती होती.
मुलाखतीदरम्यान प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपली राजकीय, सामाजिक व संघटनात्मक पार्श्वभूमी मांडली. तसेच आपल्या प्रभागातील समस्या, विकासात्मक दृष्टीकोन, जनसंपर्क, पक्षासाठी केलेले कार्य आणि आगामी निवडणुकीसाठीची तयारी याबाबत सविस्तर माहिती दिली. उमेदवारांची कार्यक्षमता, जनाधार, सामाजिक स्वीकारार्हता तसेच पक्षाशी असलेली निष्ठा या सर्व बाबींचा सखोल विचार करून मुलाखती घेण्यात आल्या.
या प्रसंगी उपस्थित नेत्यांनी उमेदवारांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले. प्राप्त अर्ज व मुलाखतीदरम्यान सादर झालेल्या माहितीनुसार सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करून पुढील टप्प्यात योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी महाराष्ट्र प्रदेशाचे निवडणूक प्रभारी आमदार चैनसुख संचेती यांच्या तर्फे सांगण्यात आले. पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने सक्षम, कार्यक्षम आणि जनतेशी नाळ जोडणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.



