ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयात निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

    कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय येनबोडी येथे निबंध स्पर्धेत गुणवंत ठरलेल्या व सहभागी विद्यार्थ्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले.

    श्रीगुरुदेव सेवाश्रम नागपूर अंतर्गत राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाचे वतीने गेल्या महिन्यात चंद्रपूर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा येनबोडी केंद्रावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येनबोडी येथील ३५६ विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला होता.

राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाचे वतीने शाळेच्या प्रांगणात निबंध स्पर्धेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. प्राचार्य नलिनी पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाचे सदस्य ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, बल्लारपूर येथील महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. श्रावण बानासुरे,प्रा. डॉ. प्रमोद घ्यार, प्रा. ईश्वर आसुटकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रावण बानासुरे यांनी केले. तर बारावी नंतर उच्च शिक्षणाच्या विविध संधी आणि करिअर संदर्भात डॉ. घ्यार यांनी विचार मांडले. कर्मवीर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सदोदित प्रयत्नशील असते, असे मत प्राचार्य पडोळे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेतून युवकांसाठी दिलेले‌ विचार आजही प्रासंगिक असून तितकेच प्रेरणादायी असल्याचे सांगून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण उन्नतीसाठी राष्ट्रसंत लिखित ग्रामगीता ग्रंथ अवश्य वाचावा,असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेश देवाळकर यांनी केले तर आभार प्रा.लोखंडे यांनी केले. केंद्र स्तरावर निबंध स्पर्धेच्या आयोजनात विशेष सहकार्य करणारे प्रा. बी. एम. डाखरे यांनाही सन्मानित करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये