विभागीय जित कुन दो स्पर्धेत देऊळगाव राजा येथील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विभागीय जित कुन दो स्पर्धा बुलढाणा येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत देऊळगाव राजा येथील स्किल डेव्हलपमेंट स्पोर्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत विद्यार्थिनी मैथिली तायडे, मयुरी थेटे तसेच विद्यार्थी राघव झोरे, आर्यन पवार, हरिओम रामाने आणि श्रीपाद चव्हाण यांनी आपल्या वजनगटात दमदार प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या यशामागे प्रशिक्षक राजेश खांडेभराड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, हे यश देऊळगाव राजा शहरासाठी अभिमानास्पद ठरत आहे. तसेच हे विजयी खेळाडू आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास पालक व प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.



