सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे एक दिवसीय आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी विद्यार्थिनींसाठी एक दिवसीय आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या शारीरिक, मानसिक व वैयक्तिक आरोग्यविषयक समस्यांबाबत जागृती निर्माण करणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
या शिबिरात डॉ. निखिल शेरकी आणि डॉ. प्राजक्ता सलामे (आरोग्यवर्धिनी केंद्र,गडचांदूर)यांनी विद्यार्थीनिंना मार्गदर्शन केले. त्यांनी किशोरवयीन आरोग्य, मासिक पाळीविषयक समस्या, आहार-विहार, मानसिक ताणतणाव, स्वच्छता व आरोग्याची काळजी याविषयांवर सविस्तर माहिती दिली. मार्गदर्शन सत्रादरम्यान विद्यार्थिनींनी मुक्तपणे आपले प्रश्न व समस्या मांडल्या. त्यावर मार्गदर्शक डॉक्टरांनी अत्यंत समजूतदारपणे, समर्पक व शास्त्रीय उत्तरे देत योग्य उपाय सुचविले आणि विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन केले.तसेच ज्यांना काही आजार असतील अशा विद्यार्थिनींना आरोग्यवर्धिनी केंद्रा मध्ये येऊन आपला ईलाज मोफत करून घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख प्रा. प्रशांत खैरे हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थिनींनी आरोग्याबाबत जागरूक राहणे अत्यंत आवश्यक असून, अशा शिबिरांमुळे आत्मविश्वास वाढतो व आरोग्यविषयक गैरसमज दूर होतात, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य महेंद्रकुमार ताकसांडे होते. त्यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. सोज्वल ताकसांडे यांनी केले, तर आभार प्रा. कु. जयश्री ताजने यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. दिनकर झाडे, प्रा नितीन सुरपाम, प्रा कु शिल्पा कोल्हे, करण लोणारे आणि सर्व प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
विद्यार्थिनींनी या आरोग्य मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपयुक्त माहिती, खुले संवाद व तज्ज्ञ मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम विद्यार्थिनींसाठी अत्यंत लाभदायक ठरला, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



