ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वदेशी संकल्प रथ यात्रेचे चंद्रपूरमध्ये उत्साहपूर्ण स्वागत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

स्वदेशी उद्योग, उत्पादनक्षमता आणि भारतीय वस्तूंच्या प्रसाराचा संदेश घेऊन देशभर भ्रमंती करणारी स्वदेशी संकल्प रथ यात्रा आज चंद्रपूर शहरात पोहोचली. स्वदेशीच्या जागृतीला नवे बळ देणाऱ्या या यात्रेचे जटपूरा वार्ड, एस.पी. कॉलेज रोड आणि समाधी वार्ड परिसरात नागरिकांनी अत्यंत जल्लोषात स्वागत केले. परिसरात “जय स्वदेशी, जय जय स्वदेशी” अशा घोषणा दुमदुमत होत्या आणि स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून यात्रेच्या संदेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

देशात उत्पादित वस्तूंचा वापर वाढावा, युवकांनी उत्पादन व उद्योग क्षेत्राकडे अधिकाधिक वळावे, तसेच भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गेल्या पंधरा दिवसांपासून ही रथयात्रा देशभर जनजागृती करत आहे. चंद्रपूरमध्ये आगमनानंतरही या यात्रेला तितकाच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमस्थळी स्वदेशी वस्तूंच्या वापराची प्रेरणा देणारे माहितीपत्रक वाटप करण्यात आले, ज्यामुळे नागरिकांमध्ये स्वदेशीचा संदेश अधिक ठोसपणे पोहोचला.

चंद्रपूरच्या स्वागत कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुभाष कासनगोटटूवार, स्वदेशी जागरण मंचाचे जिल्हा संयोजक श्री. ऐश्वर्य बांगडे, भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सौ. छबूताई वैरागडे आणि भाजपा युवा नेते श्री. अभिनय कोरपुलवार यांच्या उपस्थितीने विशेष ऊर्जा लाभली. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात युवा वर्ग, महिला प्रतिनिधी आणि जागरूक नागरिक सहभागी झाले.

चंद्रपूरकरांनी स्वदेशी संकल्प रथ यात्रेला दिलेला प्रतिसाद हा भारतीय उत्पादनांना बळ देणारा आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल अधिक सक्षम करणारा ठरेल, असे वातावरण या स्वागत सोहळ्यात पाहायला मिळाले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये