ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यासाठी १५ कोटी निधी मिळणार!

आमदार देवराव भोंगळे यांची आरोग्यमंत्र्यांसह बैठक यशस्वी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- राजुरा विधानसभा मतदारसंघातील अत्यंत दुर्गम, आकांक्षित आणि आदिवासीबहुल तालुका असलेल्या जिवती येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या कामासाठी ₹ १५.६२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यासंदर्भात आमदार देवराव भोंगळे यांनी आज विधानभवन नागपूर येथे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह बैठक घेतली.

या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी सर्व सकारात्मक कार्यवाही करून १५ कोटींचा निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे.

जिवती येथील या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामास याआधी प्रशासकीय मान्यता मिळाली होती, जी नंतर काही वर्षांच्या कालावधीनंतर सुधारित करण्यात आली. जागेतील पातळीतील मोठ्या फरकामुळे तळमजल्याखालील जागा वाहनतळ विभागासाठी तयार करावी लागल्याने मूळ खर्च वाढला. इमारतीच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून, त्यावर आजतागायत जवळपास १० कोटी ११ लक्ष इतका खर्च आला आहे. मात्र, निधीअभावी अद्याप पहिल्या मजल्याचे काम सुरू झालेले नाही.

या अडचणींवर मात करण्यासाठी तसेच, जीएसटी दरातील बदल, भाववाढ, दरसूचीतील बदल आणि आवश्यक नवीन आरोग्य सुविधा (सोनोग्राफी, एक्स-रे, हिरकणी कक्ष, नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा, आयुष आणि एनसीडी विभाग) यांचा समावेश केल्यामुळे नवीन अंदाजपत्रक तयार करणे अपरिहार्य होते. या पार्श्वभूमीवर, आमदार देवराव भोंगळे यांनी विधानभवन, नागपूर येथील कामकाज सल्लागार समिती कक्षात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचेसह बैठक करून, पहिल्या मजल्याचे बांधकाम त्वरित सुरू होण्यासाठी प्रशासकीय मान्यता व निधीची मागणी केली. यावेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आरोग्यमंत्र्यांनी या मागणीवर त्वरित कार्यवाही करून १५ कोटींचा निधी मंजूर करण्याची ग्वाही दिल्याने जिवती तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा लवकरच उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये