रेल्वे प्रवासी सेवा संस्थेच्या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांची भेट
हिवाळी अधिवेशनात मांडणार प्रश्न

चांदा ब्लास्ट
शहरातील रेल्वे संबंधित दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांची दखल घेण्यासाठी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला आज आमदार किशोर जोरगेवार यांनी आज रविवारी भेट दिली. यावेळी सदर प्रश्न नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे सांगत त्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
यावेळी यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी महानगर अध्यक्ष छबु वैरागडे, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, महामंत्री सविता दंढारे, देवानंद वाढई आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर–मुंबई सुपरफास्ट ट्रेन तसेच चंद्रपूर–पुणे फास्ट ट्रेन रोज भुसावळ मार्गे सुरू करण्याच्या प्रमुख मागण्यांसह रेल्वे संबंधित इतर मागण्यांना घेऊन रेल्वे प्रवासी सेवा संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ६ डिसेंबरपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आज रविवारी आमदार जोरगेवार उपोषणस्थळी पोहोचले आणि उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. आंदोलन कर्त्यांकडून त्यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन स्वीकारताना त्यांनी या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जात असल्याचे सांगितले. रेल्वेसंबंधी प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक त्या सर्व स्तरांवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आमदार जोरगेवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याला रेल्वेच्या उत्तम आणि वेगवान सेवांची गरज आहे. या मागण्या न्याय्य असून, जनहिताच्या आहेत. या विषयावर हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चाही करणार आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असे ते यावेळी म्हणाले.



