चंद्रपूरच्या रेल्वे प्रश्नांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सातत्याने पाठपुरावा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या रेल्वे प्रश्नांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्लीच्या तख्तावर सातत्याने आवाज उठवला आहे. अशा परिस्थितीत, ‘रेल्वे सुविधांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करत नाही’ असे निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित आरोप करणे, हे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. चंद्रपूर रेल प्रवासी संस्थेच्या उपोषणाला आमचा पूर्ण नैतिक पाठिंबा आहे, मात्र माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी, मी केलेल्या धडाडीच्या कामाचा पुरावा जनतेसमोर आहे:
खासदार धानोरकर यांचा ‘रेल्वे’साठी सातत्यपूर्ण पाठपुरावा:
१५ जून २०२४ रोजी रेल्वेमंत्र्यांना पत्र: मी स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून (पत्र क्र. १०१२/२०२४), बल्लारपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल्स (LTT) ही ट्रेन दररोज चालवण्याची आणि काजीपेठ-पुणे ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे.
४ जुलै २०२४ रोजी विद्यार्थ्यांसाठी विशेष पत्र: चंद्रपूर आणि परिसरातील हजारो विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी आहेत, हे लक्षात घेऊन काजीपेठ-पुणे एक्सप्रेस दररोज चालवण्यासाठी त्यांनी रेल्वे मंत्र्यांना पुन्हा स्वतंत्र पत्र (क्रमांक १०९८/२०२४) दिले.
०२ एप्रिल २०२५ रोजी संसदेत जाब: खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्न क्रमांक ५२११ द्वारे चंद्रपूर ते पुणे आणि मुंबईसाठी थेट रेल्वे गाड्यांची कमतरता असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि नियमित सुपरफास्ट गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती.
कोरोना काळात बंद झालेली बल्लारशाह-मुंबई लिंक कोच सेवा (जी सेवाग्राम एक्सप्रेसला जोडली जात होती) ती पूर्ववत सुरू करण्यासाठी त्यांनी पत्र (क्रमांक ३९२३/२०२४) दिले आहे, जेणेकरून सामान्य प्रवाशांची सोय होईल.
वरोरा येथील प्रवाशांच्या सोयीसाठी कोरोना काळापासून बंद असलेल्या गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्याची मागणीही त्यांनी १५ जून २०२४ च्या पत्राद्वारे केली आहे
आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, आम्ही सातत्याने मागणी करत असतानाही रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकार आमच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आंदोलकांनी आपला रोष काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीवर न काढता, निर्णयाचा अधिकार असलेल्या प्रशासनावर व्यक्त करावा.
खासदार प्रतिभा धानोरकर हे स्पष्ट करत आहेत की, यापुढेही चंद्रपूरकरांना हक्काची रेल्वे मिळेपर्यंत माझा लढा सुरूच राहणार असून, जनहिताच्या कामात राजकीय अडथळे आणणाऱ्या शक्तींचा त्यांनी तीव्र निषेध केला आहे.



