ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूर मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू होणार

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला ठाम विश्वास

चांदा ब्लास्ट

पोंभूर्णा येथे महिला बचत गट बाजारपेठेचे आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन

उमेदच्या ‘यशोगाथा’ पुस्तिकेचे आणि एआय आधारित कृषी माहितीपत्रकाचे लोकार्पण

चंद्रपूरमध्ये ८० कोटींची अत्याधुनिक महिला व शेतकरी बाजारपेठ; रोजगाराच्या नव्या संधींची निर्मिती

चंद्रपूर – महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी सातत्याने कार्यरत असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दि. ५ डिसेंबर रोजी पोंभूर्णा येथे महिला बचत गट बाजारपेठेचे भूमिपूजन झाले. या उपक्रमाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी रोजगाराच्या नव्या अध्यायाची सुरुवात होत असल्याचा आनंद आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. या बाजारपेठेच्या माध्यमातून केवळ पोंभूर्णाच नव्हे, तर संपूर्ण बल्लारपूर मतदारसंघातील महिलांच्या सक्षमीकरणाला आणि स्वावलंबनाला नवी दिशा मिळेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पोंभूर्णा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून आयोजित महिला बचत गट बाजारपेठ भूमिपूजन सोहळा आणि बचत गट महिला मेळाव्याला अतिरिक्त मुख्य कार्याधिकारी कल्पनाताई क्षीरसागर, प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार, तहसीलदार मोहनीश शेलवटकर, नगरपंचायत मुख्याधिकारी निखिल लांडगे, तालुका अध्यक्ष हरीश ढवस, सुलभाताई पिपरे, ऋषी कोटरंगे, अजित मंगळगिरीवार, विनोद देशमुख, गुरुदास पिपरे, ज्योती बुरांडे, वैशाली बोलमवार, अजय मस्के, गंगाधर मडावी, बंडू बुरांडे, ईश्वर नैताम, ओमदास पाल आणि आदि मान्यवरांची उपस्थिती होती.

या सोहळ्यात उमेदच्या ‘यशोगाथा’ पुस्तिकेचे विमोचन तसेच कृषी विभागाच्या एआय आधारित शेतीविषयक माहितीपत्रकाचे लोकार्पण आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘मुल, पोंभूर्णा आणि बल्लारपूर येथील बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. आज पोंभूर्णा येथे १ कोटी रुपये निधीतून होत असलेल्या बाजारपेठेच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने यशस्वी पाऊल टाकण्यात आले आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. पोंभूर्णा येथील महिला बचतगटांच्या बाजारपेठेचे भूमिपूजन निश्चितच बल्लारपूर मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या स्वप्नांना बळ देईल.’

यावेळी त्यांनी बल्लारपूरमध्ये सुरु असलेल्या एसएनडीटी कॉलेजमुळे ६२ कौशल्याधारित अभ्यासक्रमांद्वारे हजारो मुली व महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे विशेषत्वाने सांगितले. महिला व शेतकरी बांधवांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात येत असलेली ८० कोटी रुपयांची महाराष्ट्रातील सर्वात मोठी आधुनिक बाजारपेठ स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा आधार देणार असल्याचा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, ‘आपल्या लाडक्या बहिणी सक्षम व्हाव्यात, आत्मनिर्भर व्हाव्यात हा केवळ आपला ध्यास नाही, तर सामाजिक बांधिलकी आहे. महिलांच्या हाताला रोजगार मिळणे म्हणजे एका कुटुंबाची, एका समाजाची आणि पुढील पिढीची प्रगती होय. यासाठी बचतगटांनी कष्टाने तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या परिश्रमाला योग्य किंमत मिळावी, त्यांच्या उत्पादनांना खात्रीशीर मागणी निर्माण व्हावी आणि त्यांचे उत्पन्न वाढत राहावे, यासाठी सशक्त, कायमस्वरूपी आणि आधुनिक बाजारपेठ निर्माण करणे हा आपल्या प्रयत्नांचा केंद्रबिंदू आहे.’

महिला बचत गटांनी उद्योगातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे जे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले आहे, ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण शासनस्तरावर, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत आणि खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत. त्यांना प्रशिक्षण, वित्तीय मदत, विक्रीचे मार्ग आणि तंत्रज्ञानाची जोड मिळावी, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाचा विकास अपूर्ण आहे. म्हणूनच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढे उचललेले प्रत्येक पाऊल भविष्यातील मजबूत समाजव्यवस्थेचा आधारस्तंभ ठरेल, याची जाणीव ठेवून आपण कार्यरत आहोत, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये