जिल्हाधिकाऱ्यांकडून घुग्गुस आणि भद्रावती येथील मतदान केंद्राची पाहणी

चांदा ब्लास्ट
नगर परिषद / नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. २६) घुग्गुस आणि भद्रावती येथील मतदान केंद्राची पाहणी करून सुचना दिल्या.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी नगर परिषद, घुगुस येथील ईव्हीएम मशीन ठेवायचा सुरक्षा कक्ष व जनता विद्यालय घुगुस येथील आठ मतदान केंद्राची पाहणी केली. मतदान केंद्रावर स्वयसेवकांची नेमणूक, आवश्यक त्या सोयीसुविधा तसेच मतदान पथकांना जास्तीत जास्त व अचूक प्रशिक्षण देण्यासंबंधी सूचना केल्या.
यावेळी चंद्रपुरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, घुग्गुस न.प. चे निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रपुरचे तहसीलदार चंद्रपूर विजय पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निलेश रांजणकर व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार ओंकार ठाकरे आदी उपस्थित होते.
भद्रावती येथे जिल्हाधिका-यांची भेट : जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भद्रावती नगर परिषद निवडणूक तयारीचा आढावा घेतला. या अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावती येथील स्ट्राँग रुमला भेट दिली तसेच मतमोजणी कक्षाची देखील पाहणी केली व आवश्यक सूचना केल्यात. निवडणुकीची पुढील प्रक्रिया साहित्य वाटप, मतमोजणी प्रकिया ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावती येथे होणार आहेत.
जिल्हाधिकारी गौडा यांनी प्रभाग ११ चे मतदान केंद्र जिल्हा परिषद हायस्कूल, भद्रावती तसेच यशवंतराव शिंदे (प्रभाग ७) येथील मतदान केंद्रांना भेट दिली. या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी अतूल जटाले, भद्रावतीचे तहसीलदार बालाजी कदम, न.प. मुख्याधिकारी विशाखा शेळकी, पोलिस निरीक्षक योगेश पारधी, नायब तहसीलदार श्री. काळे, समीर वाटेकर, राकेश महकुलकर, राजू काळे इत्यादी उपस्थित होते. भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील एकूण मतदारांची संख्या ५२५७२ असून स्त्री मतदार २६५५७, पुरुष मतदार २६०१५ आहेत. एकूण मतदार केंद्राची संख्या ६३ आहे.



