
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : – बिनबा गेट परिसरातील राकेश तोतवानी यांच्या गोदामात चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून 90 किलो प्लास्टीक जप्त केले आहे शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या या व्यक्तीकडून 5 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
सोमवार 24 नोव्हेंबर रोजी पठाणपुरा गेट रोडवरून येत असलेल्या एका दुचाकी वाहनावर सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या वाहून नेण्यात येत असल्याचे मनपा उपद्रव शोध पथकास आढळून आले. त्याचा मागोवा घेतल्यानंतर तपासात समजले की सदर पिशव्या या शंकर आत्राम यांच्या मालकीच्या आहेत. तेव्हा तात्काळ छापा टाकून एकूण 3 पोते (अंदाजे 90 किलो) सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आला असून नियमांनुसार 5 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.
चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा सदर गुन्हा केल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोचविण्यात येत आहे.
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. सदर कारवाई प्रभारी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,भुपेश गोठे,शुभम खोटे,जगदीश शेंद्रे, शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लीवार, पूनम समुद्रे यांच्याद्वारे करण्यात आली.



