आ. जोरगेवार यांच्या नेतृत्वात घुग्घूसमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश

चांदा ब्लास्ट
आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वातील विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत घुग्घूस परिसरातील काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेशामुळे घुग्घूस व परिसरातील राजकारणात नवीन समीकरणे निर्माण झाली आहेत. पक्षाचा डुपट्टा टाकून सर्व नव्या सदस्यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी पक्षात स्वागत केले आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, घुग्घूस शहर अध्यक्ष संजय तिवारी, विवेक बोढे, महामंत्री नामदेव डाहुले यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, घुग्घूस आणि चंद्रपूर शहराचा सर्वांगीण विकास हा आपला एकमेव ध्यास आहे. पक्षात प्रवेश करणे ही फक्त सदस्यता नव्हे, तर विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याची संधी आहे.
ते पुढे म्हणाले, पक्ष कोणताही असो, प्रत्येक कार्यकर्ता सामाजिक बांधिलकी जपत काम करत असतो. पण विकासाची गती वाढवायची असेल, जनतेपर्यंत योजना पोहोचवायच्या असतील आणि प्रामाणिकपणे संघर्ष करायचा असेल तर भाजप हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे तुमच्या प्रवेशामुळे घुग्घूसमधील भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. नव्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेची माहिती देण्यात आली. घुग्घूस नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्ष प्रवेशाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.



