रामबाग मैदान क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आरक्षित ठेवा – आ. जोरगेवार
मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री यांची भेट घेत केली मागणी; मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ शहरातील ऐतिहासिक व मध्यवर्ती भागात असलेल्या रामबाग मैदानावर जिल्हा परिषद प्रशासनाची नवीन इमारत बांधण्याला नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे नागरिकांपासून क्रीडाप्रेमींपर्यंत सर्व स्तरातून येणाऱ्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी बुधवारी मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे मैदान कायमस्वरूपी क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी आरक्षित करण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
रामबाग मैदान हे चंद्रपूर शहराचे फुफ्फुस मानले जाते. सुमारे सात एकर क्षेत्रफळाचा हा परिसर दररोज हजारो नागरिकांच्या व्यायाम, चालणे, योग, धावणे, विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरला जातो. याठिकाणी जिल्हा परिषदेची इमारत उभारण्याचा प्रस्ताव जाहीर झाल्यापासून नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता. आंदोलनानंतर जिल्हा परिषद इमारतीसाठी खोदलेला खड्डाही बुजविण्यात आला; मात्र पर्यायी जागेबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार जोरगेवार यांनी बुधवारी मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेत, रामबाग मैदानावर कोणतीही प्रशासकीय इमारत न बांधता हे मैदान नागरिकांसाठी जतन करण्याची मागणी केली. रामबाग मैदान केवळ एक रिकामी जागा नाही, तर हजारो नागरिकांचा श्वास आहे. इथे सकाळपासून रात्रीपर्यंत क्रीडा, व्यायाम, कार्यक्रम आणि सामाजिक संवाद चालत असतो. हे मैदान पिढ्यान्पिढ्या नागरिकांनी जपले आहे. त्यामुळे याठिकाणी इमारत उभारणे अव्यवहार्य असून नागरिकांच्या भावनांचा अनादर करणारे ठरेल, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
नागरिकांनीही मैदान जपण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शविला आहे. स्थानिक रहिवासी, क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्था आणि सांस्कृतिक मंडळांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही मागणी अधिक तीव्र झाली आहे. रामबाग मैदानाचे संवर्धन आणि संरक्षण हे शहराच्या आरोग्य, खेळ संस्कृती आणि सामाजिक जीवनासाठी अत्यंत आवश्यक असल्याने शासनाने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. या संदर्भात त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे.



