परिपूर्ण पर्यावरण प्रदूषण निर्देशांकाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

चांदा ब्लास्ट
जिल्ह्यातील परिपूर्ण पर्यावरण प्रदूषण निर्देशांकाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला प्रभारी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमाशंकर भदुले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, कार्यकारी अभियंता अक्षय पगारे, वाहतूक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, तसेच महाऔष्णिक विद्युत केंद्र, वे. को. लि. चंद्रपूर, वणी, बल्लारपूर क्षेत्र, परिसरातील इतर उद्योगांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, चंद्रपूर अतिप्रदूषित क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या उद्योगांनी हवा प्रदूषण नियंत्रण व्यवस्था व्यवस्थित चालवावी. तसेच वायु प्रदूषणाचे स्त्रोत जसे की घरगुती, हॉटेल, ढाबे व रेस्टॉरंट मध्ये बेकायदेशीरपणे जाळण्यात येणारा कोळसा, नागरी परिसरामध्ये उघड्यावर घनकचरा जाळणे तसेच बांधकामामुळे होणारे वायु प्रदूषण या बाबींची वेळोवेळी पाहणी करण्याकरिता ग्रामीण व शहरी भागांसाठी दोन वेगळे भरारी पथक स्थापन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने चंद्रपूर शहरामधून होणाऱ्या अवजड वाहतूकीकरिता योग्य त्या उपाययोजना कराव्यात
प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखेने शहरातून होणाऱ्या कोळसा व इतर खनिजाच्या वाहतुकीदरम्यान अवजड वाहनांवर ताडपत्रीचे पुरेसे आच्छादन नसल्यास अशा वाहनांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करावी. वे. को.लि.द्वारे त्यांच्या खाणीमधून कोळसा वाहतूक करताना पुरेसे ताडपत्रीचे आच्छादन व टायर वॉशिंग सिस्टीम बसविणे व कार्यरत करणे आवश्यक आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने घनकचऱ्याची योग्य ती विल्हेवाट करणे व घनकचरा अवैधरीत्या जाळत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सुचना दिल्या.



