ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नांदा ग्रामपंचायतीचा गृहकर व पाणीकर मोठ्या प्रमाणात थकीत

ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहाराला फटका 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नांदा ग्रामपंचायतीचा गृहकर व पाणीकर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात थकीत असून अनेक नागरिकांनी सलग तीन, चार, अगदी पाच वर्षांपासूनही कराचा भरणा केलेला नाही. या थकबाकीमुळे ग्रामपंचायतीच्या नियमित आर्थिक कारभारावर मोठा परिणाम होत असून कर्मचाऱ्यांचा पगार, दैनंदिन साफसफाईची कामे यांसारख्या अत्यावश्यक उपक्रमांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सामान्य निधीत पैसे उपलब्ध नसल्याने अनेक आवश्यक कामे प्रलंबित राहिली आहेत.

ग्रामपंचायतीकडून सध्या घरोघरी जाऊन कर वसुलीचा उपक्रम सुरू आहे. नागरिकांनी सहकार्य करून कराचा भरणा करावा, अशी विनंती ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे. गावातील कर वसुली सुरळीत व्हावी यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी वार्डात जाऊन ग्रामस्थांशी बैठक घेणे आणि कर भरण्याचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक असतानाही या पातळीवर अपेक्षित हालचाल होताना दिसत नाही, अशी ग्रामस्थांत नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतीतर्फे गावातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आपल्या कडे थकीत असलेले गृहकर व पाणीकर स्वतःहून ग्रामपंचायत कार्यालयात जमा करून सहकार्य करावे.

यासोबतच यशोधन विहारवर असलेली तब्बल १६ लाख रुपयांची थकबाकी सुद्धा ग्रामपंचायतीसमोर मोठी समस्या बनली आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी यशोधन विहारच्या प्रोपायटर पौर्णिमा श्रीवास्तव यांच्याशी संवाद साधून थकबाकीची रक्कम प्रेमाने व नियमांनुसार वसूल करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

ग्रामपंचायतीच्या आर्थिक शिस्तीसाठी आणि गावाच्या विकासासाठी कर भरणे अत्यावश्यक आहे.

नांदाच्या सर्व नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करून आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये