माझी लाडकी बहिण योजनेची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३० दिवसाची मुदतवाढ द्या
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केलेल्या आग्रही मागणीला सकारात्मक प्रतिसाद

चांदा ब्लास्ट
आ.मुनगंटीवार यांनी महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांना दिले पत्र
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महिला व बालविकास विभागाचे सचिव यांच्यासोबत दूरध्वनीवरून आ. मुनगंटीवार यांनी केली चर्चा
महाराष्ट्रातील कोट्यवधी बहिणींना आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेचा आधार ठरलेली ‘माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५ आहे. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणावर लाभार्थींना ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करता येत नसल्याने ई-केवायसीसाठी किमान ३० दिवसांची मुदतवाढ देणे अत्यावश्यक असल्याची मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.या संदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून, या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांना पत्राद्वारे तातडीने निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर लाभार्थी बहिणी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करत असताना मोबाईलवर आधार ओटीपी येण्यात सातत्याने होणारा विलंब, ग्रामीण भागातील इंटरनेट समस्या, सेवा केंद्रांवरील वाढती गर्दी आणि तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी वारंवार अयशस्वी होत असल्यामुळे हजारो महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.ई-केवायसी वेळेत पूर्ण न झाल्यास ‘माझी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ थांबेल का, या भीतीने लाभार्थी महिलांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीची माहिती मिळताच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले की,माझी लाडकी बहिण’ ही योजना म्हणजे राज्यातील कोट्यवधी बहिणींसाठी केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या जीवनातील स्थैर्य, आत्मविश्वास आणि सुरक्षेची हमी आहे. तांत्रिक कारणांमुळे एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये. यासाठी ई-केवायसी प्रक्रियेस किमान ३० दिवसांची मुदतवाढ देणे अत्यंत आवश्यक आहे.लाखो महिलांचे हक्काचे आर्थिक सहाय्य थांबू नये, हा मुख्य उद्देश असून ई-केवायसीसाठीची अंतिम मुदत ३० दिवसांनी वाढविण्याचा निर्णय तातडीने घेण्यात यावा,अशी आग्रही मागणी आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री आणि महिला व बालविकास विभागाचे सचिव यांच्याकडे केली आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार हे नेहमी जनतेच्या समस्या समजून घेत त्यावर तात्काळ उपाययोजना करणारे संवेदनशील नेते म्हणून ओळखले जातात. कोणत्याही योजनेचा उद्देश पूर्ण व्हावा आणि पात्र लाभार्थ्यांना वेळेत मदत मिळावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. ‘माझी लाडकी बहिण’ योजनेतील महिलांना तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळताच त्यांनी कोणताही विलंब न करता थेट मुख्यमंत्री, मंत्री आणि विभागाचे सचिव यांच्याशी पत्र लिहून दूरध्वनीद्वारे संवाद साधला आणि लाखो महिलांना लाभाचा प्रवाह खंडित होऊ नये म्हणून ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची ठाम भूमिका मांडली. जनतेच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने प्रतिसाद देऊन प्रभावीपणे पाठपुरावा करणे ही त्यांची कार्यशैली असून, हिच बाब यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, हे विशेष.



