न्युमोनिया आजारापासून रक्षणासाठी विशेष जनजागृती मोहीम

चांदा ब्लास्ट
जिल्ह्यात १२ नोव्हेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ५ वर्षाखालील बालकांना न्युमोनियापासून संरक्षण करण्यासाठी विशेष जनजागृती व तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे यांच्या मार्गदर्शनात आशा कार्यकर्त्यामार्फत घरोघरी जावून बालकांची तपासणी केली जात आहे.
न्युमोनिया हा ५ वर्षाखालील बालकांचे मृत्यू होण्याचे प्रमुख कारण असल्याने लसीकरण व वेळेत उपचारावर विशेष भर देण्यात येत आहे. लक्षणे दिसताच तातडीने नजीकच्या सरकारी आरोग्य केंद्रात तपासणी करून आवश्यक उपचार घ्यावेत. सर्वात मोठा संसर्गजन्य विकार मानल्या जाणा-या न्यूमोनियाची गंभीरता लक्षात घेता दरवर्षी १२ नोव्हेंबर हा दिवस जागतिक न्युमोनिया दिन म्हणून साजरा होतो. न्युमोनियात फुफ्फुसामध्ये संक्रमण होऊन कफ भरतो, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजन कमी होते आणि श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो.
या रोगाची मुख्य लक्षणे म्हणजे खोकला, ताप, थंडी वाजणे, छातीत दुखणे. बालकाला वेळेत उपचार न केल्यास संभाव्य गुंतागुंत आणि मृत्यू होऊ शकतो. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात बालकांच्या घरघुती भेटीद्वारे लक्षणे ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. न्युमोनिया पासून संरक्षणासाठी बालकांचे लसीकरण वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.
नवजात बालकांना पहिल्या सहा महिन्यापर्यंत मातेचे स्तनपान देणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविणे, मुलांच्या आसपास धुम्रपान टाळावे, मुलांना पोषक आहारासह प्रदूषणमुक्त मोकळ्या जागेत खेळण्यास प्रोत्साहित करावे, खोकला श्वासोच्छवासात अडचण आढळल्यास नजीकच्या सरकारी आरोग्य केंद्रात तपासणी करून औषधोपचार घ्यावे. न्यूमोनियाचा वाढता धोका लक्षात घेता बालकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी आणि लसीकरण, वैद्यकीय उपचार वेळेवर करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.



