ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पैनगंगा नदीच्या पात्रातील पाणी झाले हिरवे

परिसरात चर्चांना उधाण ; तज्ञाकडून पाण्याच्या परीक्षणाची गरज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना तालुक्यातील कोडशी खुर्द परिसरातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पात्रात गेल्या दोन दिवसांपासून पाणी एकदम हिरवेगार दिसू लागले आहे. नदीचे असे रूप यापूर्वी कधीही न पाहिल्याने नागरिक, शेतकरी आणि पर्यटकांमध्ये आश्चर्य तसेच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रपूर–यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी ही जाईचा देव (अजिंठा डोंगररांगा) येथे उगम पावते व पुढे वढा येथे वर्धा नदीला मिळते. सामान्यतः स्वच्छ व पारदर्शक दिसणारे नदीचे पाणी अचानक हिरवट झाल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

 मागील काही दिवसांतील तापमानातील बदल, पाण्याचा कमी प्रवाह, नदीत साचणारे शेवाळ अथवा एखाद्या सांडपाण्याची मिसळ यामुळे रंगबदल झाला असावा. कयास ग्रामस्थांच्या चर्चेतून व्यक्त होत आहे.मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. पैनगंगा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर सिंचनासाठी वापरले जाते. “अशा प्रकारे पाण्याचा रंग बदलल्याचे आम्ही कधी पाहिले नव्हते. हे पाणी वापरण्यास सुरक्षित आहे का ” असा प्रश्न परिसरातील शेतकरी विचारत आहेत.

नदीतील पाण्याचे नमुने तातडीने तपासणीसाठी पाठवावेत आणि प्रत्यक्ष कारण शोधून जाहीर करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, कोडशी खुर्दजवळ नदीकाठी उत्सुकतेने गर्दी होत असून हिरवेगार पाणी पाहण्यासाठी लोकांची वर्दळ वाढली आहे.

नदीच्या पाण्यातील हा अचानक झालेला बदल पर्यावरणीय बदलाचा संकेत असू शकतो, त्यामुळे संबंधित विभागांनी तातडीने चौकशी करून अहवाल प्रसिद्ध करावा, अशी मागणी आहे.

प्रतिक्रिया

संथ पाण्याचा प्रवाह असल्याने येथे शेवाळ ची वाढ झाली आहे.त्यामुळे नदीच्या पात्रातील पाण्याने हिरवा रंग धारण केला आहे.

                   सुरेश चोपणे,अभ्यासक

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये