घुग्घूसचा सर्वांगीण विकास आणि प्रत्येक नागरिकाचा सन्मान हेच भाजपचे ध्येय – आ. जोरगेवार
घुग्घूस येथे कार्यकर्ता बैठक, नियोजनात्मक चर्चा

चांदा ब्लास्ट
घुग्घूस नगरपरिषद ही आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा, बांधिलकीचा आणि विकासाभिमुख विचारांचा मजबूत किल्ला आहे. आगामी निवडणूक घुग्घूसच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी नवे विकासद्वार उघडण्याची मोठी संधी आहे. घुग्घूसचा सर्वांगीण विकास आणि प्रत्येक नागरिकाचा सन्मान हेच भाजपचे ध्येय आहे, असे आमदार जोरगेवार म्हणाले.
घुग्घूस नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने घुग्घूस येथे शनिवारी नियोजनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते प्रकाश देवतळे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, घुग्घूस शहर अध्यक्ष संजय तिवारी, विवेक बोढे, तुषार सोम, बलराम डोडाणी, अजय जयस्वाल, तालुका अध्यक्ष विनोद खेवले, महामंत्री सविता दंढारे, आशिष मासिरकर, नीतू चौधरी, निरीक्षण तांड्रा, चिन्ना नलवेगा, हेमंत उरकुडे, संतोष नुने, सुचिता लुटे, साजन गोहणे, इमरान खान, विनोद चौधरी, संजय भोंगळे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना आ. जोरगेवार पुढे म्हणाले की, आजची ही बैठक अपार ऊर्जा देणारी आहे. येथे उपस्थित प्रत्येक कार्यकर्ता हा आमच्या पक्षाचा बळ, आधार आणि प्रेरणा आहे. घुग्घूसमध्ये केलेल्या विकासकामांची एक मोठी यादी आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगारनिर्मिती या सर्व क्षेत्रांत आपण सातत्याने काम केले. नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच घुग्घूस मध्ये भाजपा मजबूतपणे उभी आहे.
निवडणूक प्रक्रिया म्हणजे केवळ प्रचार नव्हे तर सततचा संवाद आहे. प्रत्येक बूथ हा आपला कुटुंब आहे. त्या कुटुंबातील प्रत्येक मतदाराशी आपण मनापासून संवाद केला पाहिजे. भारतीय जनता पक्षाची ताकद ही कार्यकर्त्यांच्या शिस्तीत आणि समर्पणात आहे. ही लढत विकासाच्या विचारांची आहे. आपल्या प्रयत्नांनी आणि जनतेच्या विश्वासाने निश्चितच आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयी ठरेल. आपण सर्वांनी बूथस्तरावर तयारी अधिक मजबूत करावी, असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, घुग्घूस ग्रामपंचायत असताना निधी कमी होता. अशा परिस्थितीतसुद्धा आपण येथे सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. आता ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषद झाले आहे. त्यामुळे येथे विकासकामे अधिक गतीने करण्याची संधी आहे.
घुग्घूस नगरपरिषद निवडणूक २०२५ ही केवळ स्थानिक निवडणूक नसून घुग्घूस च्या विकासाचा एक निर्णायक टप्पा आहे. भारतीय जनता पार्टीने गेल्या काही वर्षांत केलेल्या विकासकामांचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळतो आहे. हीच विकासाची परंपरा घुग्घूसमध्येही पुढे न्यायची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले.
बुथ स्तरावर मजबूत रचना उभी राहिली पाहिजे. प्रत्येक बूथवर सामूहिक प्रयत्न आणि समन्वय अत्यंत गरजेचा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागातील मतदारांपर्यंत पोहोचून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती दिली पाहिजे. विकासाचे राजकारण लोकांपर्यंत पोहोचवणे हेच खरे जनसेवा कार्य आहे, असे ते यावेळी म्हणाले. या बैठकीला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



