कापूस–सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा
शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत शासन यंत्रणा निष्क्रिय बसल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांनी केला असून, शासन व संबंधित यंत्रणांनी कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावेत अशी मागणी केली आहे.
नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरीही अद्यापपर्यंत सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू केलेले नाही, तसेच नाफेडनेही सोयाबीन खरेदीची प्रक्रिया सुरू केली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात संताप आणि नाराजीचे वातावरण आहे. तसेच, दरवर्षी शेतकऱ्यांकडून हेक्टरी ३० क्विंटलपर्यंत कापूस खरेदी करण्यात येत होता. मात्र यंदा सरकार हेक्टरी केवळ १४ क्विंटल कापूस खरेदी करण्याच्या विचारात आहे. हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून, मागील वर्षीप्रमाणे यंदाही हेक्टरी ३० क्विंटल कापूस खरेदी करण्यात यावा अशी ठाम मागणी जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांनी केली आहे.
यावर्षी पडलेल्या अति पावसामुळे कापसात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत १२ टक्क्यांऐवजी १४ टक्क्यांपर्यंत आर्द्रता ग्राह्य धरावी, अन्यथा मोठ्या प्रमाणात कापूस नाकारला जाईल आणि शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असेही भास्कर ताजणे यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडलेले असताना, खरेदी केंद्र न सुरू झाल्याने त्यांच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ खरेदी प्रक्रिया सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल असा ईशाराही जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांनी दिला आहे.



