एकात्मतेच्या शक्तीने घडणार समृद्ध बल्लारपूर _ आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपा महिला मेळावा उत्साहात

चांदा ब्लास्ट
बल्लारपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीतर्फे बल्लारपूर येथे भव्य महिला मेळावा उत्साहात पार पडला. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेला बल्लारपूर शहरातील सर्व धर्मीय भगिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला. महिलांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने महिला मेळावा ‘हाऊसफुल’ झाला. यावेळी आ. श्री. मुनगंटीवार यांनी मेळाव्याला संबोधित करताना एकात्मतेच्या शक्तीने समृद्ध बल्लारपूर घडणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
भाजपा बल्लारपूर आयोजित महिला मेळाव्यात शहरातील विविध समाजघटकांतील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, रणंजय सिंग, रेणुकाताई दुधे, वैशालीताई जोशी, कांताबाई धोटे, आरतीताई आकेवार, वर्षाताई सुंचूवार, पुनमताई मोडक, जयश्रीताई मोहुर्ले, सारिकाताई कनकम, सुरेखाताई श्रीवास्तव आदिंची उपस्थिती होती.
आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘समृद्ध बल्लारपूर’ हे फक्त घोषवाक्य नसून प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून पूर्ण होणारा संकल्प आहे. या शहराचा सर्वांगीण विकास, प्रत्येक कुटुंबाला स्वतःचं घर, स्वच्छ रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी, या दिशेने मी सातत्याने प्रयत्नशील आहे. आतापर्यंत ६०० निवासी पट्ट्यांचे वितरण करण्यात आले असून पुढील काळात हे प्रमाण आणखी वाढवले जाईल. पंतप्रधान आवास योजनेद्वारे सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळावं, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’
आ.मुनगंटीवार म्हणाले, “बल्लारपूर देशातील आदर्श शहर व्हावे, आत्मनिर्भर व्हावे आणि सर्वांसाठी समान संधीचे केंद्र बनावे, हेच आमचे ध्येय आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवावा, कारण द्वेष आणि विभागणीचा मार्ग कधीच प्रगतीकडे नेत नाही.’
या मेळाव्यात महिलांची प्रचंड उपस्थिती पाहून आ.सुधीर मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले. “सर्वधर्मीय बहिणींच्या उपस्थितीत आज मला छोटा भारत अनुभवायला मिळाला. प्रेम, सौहार्द आणि एकोपा यांचा सुरेख संगम इथे बघायला मिळाला,’ अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमात मुस्लिम भगिनींनी भाजपा कार्यकर्त्यांकडे पक्षाचा दुपट्टा मागितला, याचा उल्लेख करत आ. मुनगंटीवार म्हणाले की, “हा विश्वास विकासाचं प्रतीक आहे. हा देश सबका साथ, सबका विकास या मंत्रावरच पुढे जात आहे.”
कार्यक्रमात महिलांच्या हक्क, सक्षमीकरण आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. आ.मुनगंटीवार म्हणाले की, बल्लारपूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि पुढील काही महिन्यांत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आणखी मोठे प्रकल्प राबविण्यात येतील. शहरात लवकरच शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी नव्या योजना सुरू होणार आहेत.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट संदेश दिला की, “प्रत्येक मतदाराशी संपर्क साधणे, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवणे हेच खरे राजकारण आहे.”त्यांनी पुढे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले.
या मेळाव्यात आ.मुनगंटीवार यांनी भाजपा महिला अध्यक्षा वैशालीताई जोशी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कुशल संघटनक्षमतेचं कौतुक केलं. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थित सर्व भगिनींना वंदे मातरमच्या घोषासह देशभक्तीचा संदेश दिला. त्याचबरोबर टेलिफोनवर ‘हॅलो’ ऐवजी वंदे मातरम्’ म्हणण्यासाठी आवाहन केले.



