आजगाव शेतशिवारात देवळी पोलिसांची धडक “वॉश आऊट मोहीम”
अवैध सडवा रसायन नष्ट, महिला आरोपी फरार!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
देवळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आजगाव शेतशिवारात पोलिसांनी शनिवारी मोठी “वॉश आऊट” मोहीम राबवून अवैध दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे सडवा रसायन जप्त करून जागीच नष्ट केले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक मा. श्री. अमोल मंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असून, परिसरात शांतता राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी ही विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती.
मोहीमे दरम्यान आजगाव शिवारातील झुडपी भागात पोलिसांना जमिनीत गाडलेले आणि झुडपात लपवून ठेवलेले 13 लोखंडी ड्रम, प्रत्येकी 200 लिटर प्रमाणे एकूण 2,600 लिटर कच्चे सडवा रसायन सापडले. या रसायनाची किंमत अंदाजे ₹5,20,000 इतकी असून, यासोबतच 13 लोखंडी ड्रम (₹13,000) व 5 अॅल्युमिनियम घमेले (₹2,500) असा एकूण ₹5,35,500 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी पंचासमक्ष जप्त करून नष्ट केला.
दरम्यान, घटनास्थळावरून एक महिला संशयित सिमा विनायक कांबळे (वय 45) ही फरार झाली असून तिच्याविरुद्ध कलम 65(फ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना खारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार अमोल मंडाळकर, पो.उप.नि. प्रकाश निमजे, पो.हवा. अमोल आलवाडकर, पो.ना. स्वप्नील वाटकर, व पो.काँ. मनोज नप्ते यांनी केली.
या धाडसी कारवाईमुळे देवळी पोलिसांनी दारूबंदी कायद्याला बळ दिले असून, ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.



