शेतकऱ्यांची अडचण वाढली : कुचना-पडसगाव, शिरना नाल्यावरील बंधाऱ्याचे काम थांबले
रस्ता बंद झाल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर : शेतकऱ्यांचा माल शेतातच

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
मौजा कुचना–पडस गावालगत शिरना नाल्यावर जलसंधारण विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या कामामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. बंधाऱ्याचे बांधकाम अर्धवट अवस्थेतच थांबल्याने त्या परिसरातील मुख्य शिवरस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. सदर काम जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य, कार्यकारी अभियंता कार्यालय, चंद्रपूर यांच्या अखत्यारीत सुरू करण्यात आले होते.
कामाच्या सुरुवातीसच मोठ्या प्रमाणात खोदकाम करून बांधाचा पाया तयार करण्यात आला. मात्र क्राफ्रीटची उंची अंदाजे एक मीटरवर गेल्यानंतर काम थांबले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असून, शेतकऱ्यांना शेतात जाण्यास गंभीर अडचणी येत आहेत. या मार्गाने दररोज अनेक शेतकरी आपला शेतीमाल, जनावरे तसेच कृषी अवजारे घेऊन शेतात जात असत. पण आता रस्ता बंद झाल्यामुळे शेतातील तांदूळ, सोयाबीन, कापूस इत्यादी माल शेतातच अडकून पडला आहे. वाहने जाऊ शकत नसल्याने तो बाजारपेठेत पोहोचविणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल बदखल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन सादर केले.
निवेदनात जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन मौका चौकशी करावी, तसेच रस्ता पूर्ववत करून वाहतुकीस योग्य बनवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना शेतकरी भास्कर पिदुरकर, परशुराम डाहूले यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देऊन काम पूर्ण करण्याची मागणी केली असून, हंगामाच्या काळात वाहतुकीचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबू,असा इशाराही यावेळी देण्यात आला.



