कर्जबाजारीपणामुळे विवंचनेत शेतकऱ्याची आत्महत्या
चालबर्डीतील विठोबा झाडे यांनी रेल्वेखाली येऊन संपविले जीवन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शेतीतील नापिकी आणि बॅंकेचे वाढते कर्ज या दुहेरी संकटातून मार्ग काढता न आल्याने चालबर्डी (कोंढा) येथील ७० वर्षीय शेतकरी विठोबा नागोबा झाडे यांनी आज (शनिवार, ९ नोव्हेंबर) सकाळी आत्महत्या केली. माजरी रेल्वे स्टेशन परिसरात त्यांनी रेल्वेखाली येऊन जीवन संपविले.
मिळालेल्या माहितीनुसार, विठोबा झाडे यांच्या नावावर चालबर्डी येथील सर्व्हे क्र. ७४ मध्ये ०.८१ हेक्टर इतकी शेती आहे. गेल्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतात पूर्ण नापिकी झाली. त्यामुळे उत्पन्न मिळाले नाही आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तब्बल ६० हजार रुपयांचे कर्ज फेडणे त्यांना अशक्य झाले. घर चालवणे आणि कर्जफेड दोन्ही संकटे डोक्यावर आल्याने ते गेल्या दहा दिवसांपासून तीव्र मानसिक तणावाखाली होते.
आज सकाळी ते घरून बाहेर पडले आणि थेट माजरी रेल्वे परिसरात जाऊन गाडीखाली येऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विठोबा झाडे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि पाच मुली असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचे आणि आर्थिक संकटाचे सावट आले आहे. या घटनेची माहिती मिळताच शेतकरी संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल बतखल तसेच चालबर्डीचे सरपंच विजय खंगार यांनी शोक व्यक्त करत जिल्हा प्रशासनाकडे पीडित कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या घटनेची नोंद स्थानिक पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे. या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा व नापिकीच्या संकटाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



