विकासकामात पुरातत्व विभागाच्या येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करा – आ. जोरगेवार
आ. जोरगेवार यांची दिल्लीमध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण महासंचालकाशी सविस्तर चर्चा

चांदा ब्लास्ट
जिल्ह्याच्या प्राचीन, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन, जतन तसेच पर्यटनविकासाला चालना देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी चंद्रपूर शहराच्या विकासात पुरातत्व विभागाकडून येणाऱ्या अडचणी सोडविण्याची मागणी त्यांनी केली.
या बैठकीदरम्यान आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूर येथील पुरातन वारसा स्थळांशी संबंधित अनेक कामांमध्ये पुरातत्व विभागाकडून येणाऱ्या अडचणींकडे महासंचालकांचे लक्ष वेधले. विशेषतः श्री माता महाकाली मंदिर परिसराच्या विकास आराखड्यास तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली.
तसेच, ऐतिहासिक चंद्रपूर किल्ल्याचा संपूर्ण जीर्णोद्धार, तटबंदीवरील दरवाजे व खिडक्यांची पुनर्बांधणी, अंचलेश्वर मंदिर आणि गोंड राजांच्या समाधीस्थळांचा विकास या विषयांवरही त्यांनी विशेष भर दिला. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र, तसेच प्रलंबित एएसआय साइट म्युझियमचे बांधकाम या तांत्रिक विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. या सर्व प्रकल्पांमुळे चंद्रपूरचा ऐतिहासिक वारसा अधिक दृश्यमान होईल आणि पर्यटनाच्या दृष्टीने शहराची ओळख देशभरात निर्माण होईल, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
यासोबतच त्यांनी माता नगर, लालपेठ येथील दशमुखी दुर्गा मातेच्या मूर्तीचे जतन व संरक्षक शेड बांधकाम तातडीने करण्यात यावे, अशी मागणीही महासंचालकांकडे केली. मूर्तीचे धार्मिक आणि कलात्मक महत्त्व लक्षात घेता तिचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार जोरगेवार यांनी पुढे सांगितले की, श्री माता महाकाली मंदिर परिसराच्या विकासकामांसाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या ५९ कोटी रुपयांच्या आराखड्यास भारतीय पुरातत्व विभागाने तातडीने मान्यता द्यावी, तसेच आवश्यक रासायनिक प्रक्रिया आणि संवर्धन कार्ये तत्काळ सुरू व्हावी.
ते म्हणाले, चंद्रपूरचा वारसा हा केवळ एका जिल्ह्याचा नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान आहे. पुरातत्व विभागाच्या सहकार्याने या वारशाचे पुनरुज्जीवन झाल्यास चंद्रपूर हे एक प्रमुख हेरिटेज-टुरिझम डेस्टिनेशन म्हणून उदयास येईल,असे त्यांनी नमूद केले. महासंचालक यदुबीर सिंह रावत यांनी आमदार जोरगेवार यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे सांगितले आहे.



